
अमरावती: धारणी येथील जिल्हा परिषदेच्या पीएम श्री सेमी इंग्रजी पूर्व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच तहसील कार्यालयाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. विशेष म्हणजे, शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना ‘साहेब’ न म्हणता केवळ ‘तहसीलदार’ असे संबोधण्यास सांगितले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला. शालेय उपक्रमांतर्गत शिक्षकांनी या क्षेत्रीय भेटीचे आयोजन केले होते. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी तालुक्यातील तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाणे यांसारख्या विविध शासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेट दिली. या भेटींचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची माहिती देणे हा होता. भेटीदरम्यान तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि तालुका कृषी अधिकारी उमेश यादव यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना तालुक्याची भौगोलिक माहिती दिली. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार राजेश माळी आणि वरिष्ठ लिपिक निलेश सपकाळ हे देखील उपस्थित होते. एका विद्यार्थ्याने तहसीलदारांना त्यांच्या वेतनाबद्दलही प्रश्न विचारला. कृषी अधिकारी उमेश जाधव यांनी कृषी विभागाचे महत्त्व, फळझाडे आणि पिकांविषयी माहिती दिली. त्यांनी कृषी विभाग मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली असता, आरोपींना कोठडीत कसे ठेवले जाते, हे पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी दाखवण्यात आली. या क्षेत्रीय भेटीच्या आयोजनात शाळेचे मुख्याध्यापक प्रभुदास बिसंदरे, सहाय्यक शिक्षिका नूतन गैलवार, सीमा भुजाडे, बंशीलाल कासदेकर आणि ऋतिका यांनी सहकार्य केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



