
नाशिक जिल्ह्यातील वडनेर गावात रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. गावातील तीन वर्षांचा आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या सणाआधीच गावावर शोककळा पसरली. आयुषची दहा वर्षांची बहीण श्रेयान
.
किरण भगत यांचे कुटुंब वडनेर परिसरात वास्तव्यास असून, शेताजनीकच त्यांचे घर आहे. त्यांना श्रेया आणि आयुष अशी दोन मुले आहेत. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास मळ्यात खेळायला गेलेल्या आयुषवर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर तो मुलाला ओढत शेतात घेऊन गेला. जेवणासाठी वडिलांनी आयुषला हाक मारली, पण त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. मुलगा दिसत नसल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. जवळपास तीन तास सुरू असलेल्या शोधामध्ये ग्रामस्थांसह वन विभाग, श्वानपथक आणि पोलिसांचा सहभाग होता. अखेर रात्री पावणे बारा वाजता ऊसाच्या शेतात रक्तबंबाळ अवस्थेत आयुषचा मृतदेह आढळला.
बहिणीने पूर्ण केली भावाची अखेरची इच्छा
आयुषच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ‘ताई, तू मला सकाळी राखी बांध, मी तुला गिफ्ट देईन’ असे आयुषने रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी बहिणीला सांगितले होते. परंतु त्या आधीच तो कायमचा दूर गेला. तरीही, बहिणीने त्याची शेवटची इच्छा पूर्ण केली. श्रेयाने अंत्यसंस्कारापूर्वी आयुषच्या निष्प्राण मनगटावर राखी बांधली. राखी बांधताना तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला आणि पाहणारा प्रत्येक जण हेलावून गेला. यावेळी श्रेयाचा आक्रोश पाहून ग्रामस्थांना डोळ्यांतले पाणी थांबवणे अशक्य झाले.
वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू
श्रेया रात्रभर भावाच्या आठवणीत रडत होती, तर संपूर्ण वडनेर गाव या दुःखद घटनेने स्तब्ध झाला होता. रक्षाबंधनाच्या दिवशी गोड आठवणींऐवजी अश्रूंची राखी आणि चिमुकल्याचा अकाली मृत्यू हा गावासाठी कायमचा जखम बनून राहिला. दरम्यान, या घटनेनंतर भगत कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, गावात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने बिबट्याचा शोध सुरू केला आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.