
Maharashtra Weather News : केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं देशभरातील हवामानाचा प्राथमिक अंदाज वर्तवताना पुढील 24 तासांमध्ये देशातील उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांसह पश्चिम बंगालमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे. तर, इथं महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये होरपळ कायम असतानाच विदर्भ आणि नजीकच्या भागांमध्ये मात्र तापमानात अनपेक्षित घट नोंदवण्यात आली आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पूर्व विदर्भात पुढील 24 तासांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून, इथं सोसाट्याच्या वाऱ्यांसह पवासाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तापमानात घट, नागरिकांना किमान दिलासा
सध्या राजस्थानच्या नैऋत्येपासून नजीकच्या भागावर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत आहे. परिणामस्वरुप उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, त्याच पश्चिम विदर्भ आणि कर्नाटक ते केरळदरम्यानच्या कमी दाबाच्या पट्ट्याचीही भर पडत आहे. या संपूर्ण प्रणालीमुळं महाराष्ट्रात एकाएकी तापमानात घट नोंदवण्यात आली आहे, ज्यामुळं नागरिकांना किमान दिलासा मिळताना दिसत आहे.
ढगांची दाटी आणि हवेत गारवा…
राज्याच्या कोकण, मुंबई शहर आणि उपनगरांसह पालघरपर्यंतही तापमानात घट नोंदवण्यात आली असून, पहाटेच्या वेळी पावसाळी ढगांची दाटी पाहता या भागांमध्ये फक्त पहाटेच्या वेळी अंशत: गारवा पसरण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची हजेरी असेल असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
राज्यात एकिकडे तामपानात घट होत असली तरीही परभणी, अकोला, वाशिम, ब्रह्मपुरी या भागांमध्ये पारा 41 ते 42 अंशांदरम्यानच आहे. तर, बुलढाण्यात तापमान 40 अंशांवर आलं आहे. तेव्हा आता तापमानातील ही घट आणखी किती दिवस टिकून राहते आणि कुठे पुन्हा होरपळ डोकं वर काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
केरळमध्ये मान्सूनपूर्व सरी
देशातील मान्सूनचं प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या केरळ राज्यामध्ये मान्सूनपूर्व वातावरणनिर्मिती होत असून, प्रत्यक्षात मान्सूनच्या आगमानाआधी इथं समाधानकारक पर्जन्यमान नोंदवण्यात आलं आहे. 1 मार्च ते 27 एप्रिलदरम्यान केरळमध्ये सामान्यहून 39 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली. केरळच्या बहुतांश भागात पुढील 24 तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.