
तिवसा येथील अशोकनगरात बुधवारी सकाळी मायलेकचा खून झाला. या प्रकरणातील आरोपी रोहन सुधाकर अवझाड (वय २१ वर्षे) हा योग्य वेळेची वाट पाहत होता. त्याच्या वडिलांचा मारेकरी (अमोल डाखोरे) हा जामीनावर सुटून आल्यामुळे रोहनची खुमखुमी अगदी तीव्र झाली होती. परंतु अमोलकडे महालक्ष्मीचा कार्यक्रम असल्याने त्याने प्रतीक्षा केली आणि आज, बुधवारी सकाळी अमोलवर (४० वर्षे) हल्ला चढवताना बचाव करण्यास मध्ये आलेल्या अमोलच्या आई सुशीलाबाई (६५ वर्षे) यांच्यावरही हल्ला चढवला. या दुहेरी हत्याकांडामुळे अख्खे शहर हादरले असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून गर्दीला नियंत्रित करुन तपासकार्य सुरु केले. दरम्यानच्या काळात आरोपी रोहन अवझाडने स्वत:च पोलिस ठाणे गाठून स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. त्यामुळे पोलिसांना तपासकार्यात मोठी मदत झाली. या घटनेनंतर अमोल डाखोरे यांच्या पत्नी व मुलांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यानच्या काळात शेजाऱ्यांसह गावातील नागरिकांनीही तेथे मोठी गर्दी केली. घटनास्थळावर पोचलेला प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत शहारुन गेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजारी राहणारे डाखोरे व अवझाड या दोन्ही कुटुंबामध्ये बरेच दिवसांपासून वाद सुरु होता. याच वादातून दीड वर्षांपूर्वी अमोलने २७ मार्च २९२४ रोजी रोहनचे वडील सुधाकर अवझाड यांच्यावर शेतात कुऱ्हाडीने वार करुन त्यांचा खून केला होता. दरम्यान त्यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने आज सकाळी रोहन हा डाखोरे यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ करु लागला. या शिवीगाळीमुळे अमोल डाखोरे घराबाहेर आला. हीच संधी साधून रोहनने त्याला पकडून त्याच्या पोटावर, छातीवर व पाठीवर चाकूने सपासप वार केले. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि काही वेळाने गतप्राण झाला. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी आई सुशीलाबाई डाखोरे पुढे आल्या. मात्र सूडाने पेटलेल्या रोहनने त्यांना बाजूला करताना त्यांच्या गळ्यावरही चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडानंतर रोहनने स्वत:च चाकूसह पोलिसांत धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी अमोल डाखोरे यांच्या पत्नी मंगला डाखोरे यांनी तिवसा पोलिसांत फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून तिवसा पोलिसांनी रोहन सुधाकर अवझाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास तिवस्याचे पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस करीत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.