digital products downloads

‘तुमच्या मनात कसलीही शंका असेल तर…’, उद्धव ठाकरेंचं नाव घेत भास्कर जाधवांचा लेटरबॉम्ब

‘तुमच्या मनात कसलीही शंका असेल तर…’, उद्धव ठाकरेंचं नाव घेत भास्कर जाधवांचा लेटरबॉम्ब

Kokan Political News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जात असलेले भास्कर जाधव यांचे आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. राजकारण करायला मला कोणी शिकवण्याची गरज नाही. 40 वर्ष मी याच क्षेत्रात आहे. एक गेला तर चार निर्माण करेन. परंतु मी आक्रमक असलो तरी अत्यंत संवेदनशील आहे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. अजून माझी आमदारकीची चार वर्ष बाकी आहेत याची जाणीव स्वकीयांना नसली तरी विरोधकांना नक्की आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढायची माझ्यात धमक आहे, असा इशाराच भास्कर जाधवांनी दिला आहे. जे गेलेत ते आता बाकी सर्वांना फोन करून आम्ही विकासासाठी गेलो आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असं सांगत आहेत. थांबा, घाई करू नका, असंही भास्कर जाधवांनी म्हटलंय. 

नेमकं आपल्या कार्यकर्त्यांना लिहीलेल्या पत्रात भास्कर जाधव यांनी काय म्हटले  आहे? पाहूयात त्यांनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं…

सस्नेह जय महाराष्ट्र !!

’भास्कररावांवर आमचा राग नाही, मतदारसंघाचा व आमच्या भागाचा विकास हा भास्करराव यांनीच केला, कोट्यवधीचा निधी हा भास्कररावांच्या माध्यमातूनच आला…’ ही वाक्य व ही भाषा आहे गेल्या काही दिवसात पक्ष सोडून गेलेल्या लोकांची, आणि मग जाण्याचं कारण काय सांगतात तर आम्हाला सत्तेत जायचे आहे, आम्हाला विकास करून घ्यायचा आहे.

व्वा! मला हा विषय तुम्हा सर्वांशी बोलावासा वाटला, कारण मी स्वतः संभ्रमात आहे. ज्या विकासाचे कारण देऊन तुम्ही अन्य पक्षात गेल्याचे स्वतःचे समर्थन करताय म्हणजेच स्वतःशी खोटं बोलून जनतेची फसवणूक करत आहात, यांची विकासाची नक्की व्याख्या काय? कोणता शाश्वत विकास यांना अपेक्षित आहे? स्पष्टपणे एखाद्या विशिष्ट कामाचा उल्लेख यांच्याकडून ऐकलात का आपण? बांधवानो- भगिनींनो, धादांत खोटं बोलून केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी हा पक्षप्रवेश झाला आहे, हे तुमच्या लक्षात असूदे..

2007 पासून मी गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे काम करायला सुरुवात केली त्यावेळेला कोणत्याही गावामध्ये एखादा सरपंच देखील आपल्या विचाराचा नव्हता. तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन, सर्वांशी आपुलकीने वागून, विरोधकांच्या धाकदपटशाही, लेखणीचा दहशतवाद व खोतीविरोधात लढून खऱ्या अर्थाने विकासाचे खरे रूप गुहागरला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला… खाजगी मालकीच्या असलेल्या अनेक पायवाटा,विहिरी, रस्ते, सभागृह, पाणीयोजना मी जनतेसाठी मोकळ्या करून दिल्याच. त्याचबरोबर वाडी–वस्तीवर रस्ता, पाणी, वीज, पूल, सामाजिक सभागृह अशी कितीतरी विकासाची कामं करण्याचं भाग्य मला लाभलं. दोन वेळा आलेल्या निसर्गाच्या संकटावेळी तुमच्या सर्वांच्या पाठी ठाम उभा राहून नुकसान भरपाई मिळवून देण्यासोबतच सर्वांचे जीवन पूर्ववत होण्यासाठी महाराष्ट्रातील सगळी यंत्रणा माझ्या गुहागरमध्ये आणली. लोकप्रतिनिधी म्हणून माझे हे कर्तव्य बजावण्यात मी कधी कसूर केलेलीच नाही, परंतु त्याही पलीकडे आपल्यापैकी अनेकांच्या वैयक्तिक अडचणीत मग पंचायत समिती असो, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन असो, कुठे अपघात झाला असो व दवाखाना असो प्रत्येक प्रसंगात तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहिलो आहे. वैद्यकीय मदत करताना पुणे –मुंबईसारख्या ठिकाणी आपणाला सर्वोत्तम उपचार देण्यासाठी कायम झगडलो आहे. कोरोनासारख्या संकटात माझ्या स्वतःच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना घरात बसून न राहता आपणा सर्वांना योग्य उपचार मिळावेत, चाकरमानी सुखरूप आपल्या घरी यावेत म्हणून प्रसंगी अनेकांचा वाईटपणादेखील घेतला आहे. 

हे सगळं तुम्हाला माहित नाही का? शंभर टक्के तुम्हाला तुम्हा सगळ्यांना याची जाणीव आहे. मग मी परत याची उजळणी आज का करतोय? मित्रांनो, मी पण माणूस आहे, मला पण मन आहे. वेदना होतात मनाला… राजकारण करायला मला कोणी शिकवण्याची गरज नाही. 40 वर्ष मी याच क्षेत्रात आहे. एक गेला तर चार निर्माण करेन. परंतु मी आक्रमक असलो तरी अत्यंत संवेदनशील आहे, एवढी वर्ष जीवाभावाप्रमाणे जपलेली माणसं घर सोडून जातात तेव्हा दुःख तर होणारच ना?

बांधवांनो– भगिनींनो, मी कुणालाही कधी माझा कार्यकर्ता बोलत नाही. सर्वांना मी माझे सहकारी म्हणतो. त्यांच्याशी कार्यकर्त्याप्रमाणे कधीच वागलो नाही. हे जे सोडून गेलेत या सर्वांना कायम मानाचं ताट वाढलं आहे. घरातील सदस्य म्हणून भावा– बहिणीप्रमाणे यांच्याशी वागलो आहे.

जे गेलेत ते आता बाकी सर्वांना फोन करून आम्ही विकासाकरता गेलो आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असं सांगत आहेत. थांबा, घाई करू नका. यापूर्वी जे गेले त्यांनी विकासाकरता किती पैसे आणले? आणि कोणता विकास केला? हे जरा तपासून बघा. आणि आता जे गेलेत ते विकासाकरता किती पैसे आणणार आहेत? नक्की कोणता व कोणाचा विकास करणार आहेत? हेही जरा अनुभवा आणि पहा. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कसल्याही भूलथापांना बळी पडू नका, यांच्या खोटेपणाच्या नादी लागू नका, विकास विकास काय घेऊन बसलात तुमचा भास्कर जाधव खंबीर आहे. 

अजून माझी आमदारकीची चार वर्ष बाकी आहेत याची जाणीव स्वकीयांना नसली तरी विरोधकांना नक्की आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढायची माझ्यात धमक आहे आणि हो त्याउपर याबाबतीत तुमच्या मनात कसलीही शंका असेल तर थेट माझ्याशी बोला. अफवांवर विश्वास ठेऊ नका. आपले सर्वांचे प्रेम तर माझ्यावर आहेच, त्यात अधिकची वाढ व्हावी ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला सोबत घेऊन आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवत ठेवेन याची खात्री देतो.

लवकरच गावी आणि मुंबईला जाहीर मेळावे घेणार आहे. त्यावेळेला भेटू आणि खूप काही बोलू…!!

धन्यवाद !!

आपला स्नेहांकित,

भास्कर जाधव
(आमदार–गुहागर विधानसभा)

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp