
ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी मंदिरात दर दिवशी मोठ्या संख्येनं भाविकांची रिघ पाहायला मिळते. देशाच्या विविध भागांमधून भाविक इथं येत देवीचं दर्शन घेतात. मात्र याच तुळजाभवानी देवीच्या ऐतिहासिक शिल्पावरून आता मतभेद निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं 108 फूट उंच भव्य ऐतिहासिक शिल्प तुळजापुरात उभारलं जाणार आहे मात्र हे शिल्प नेमकं कसं असावं यावरून हा वाद निर्माण झाला आहे. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
तुळजाभवानी मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या 108 फुटी ऐतिहासिक शिल्पावरून वाद पेटला आहे. देवीचं मूळ स्वरूप बदलून दाखवलं जात असल्याचा आरोप पुजारी मंडळ, मराठा क्रांती मोर्चा यांनी केला, तर मंदिर संस्थानचं पत्रही यामध्ये नवा वाद निर्माण करतंय. या वादाचे पडसाद आता थेट मुंबईत होणाऱ्या बैठकीपर्यंत गेले आहेत. जिथं 17 जूनला मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
काय आहे मूर्तीचा वाद?
मंदिर संस्थानने जाहीर केलेल्या संकल्पचित्रात आई तुळजाभवानी अष्टभुजा अवस्थेत शिवरायांना भवानी तलवार देताना दाखवलं आहे. मात्र प्रत्यक्ष इतिहासात देवी दोन भुजांमध्ये तलवार देताना आहे. म्हणून हे शिल्प मूळ स्वरूपातच असावं, अशी मागणी पुजारी मंडळ, मराठा क्रांती मोर्चा यांनी केली आहे
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सुनील नागने यांच्या माहितीनुसार शिल्प उंच किती आहे, यापेक्षा ते मूळ स्वरूपात असावं. अष्टभुजा रूप नव्हे, तर दोन हातांच्या रूपात शिवरायांना तलवार देताना दाखवलं पाहिजे.
मंदिर संस्थानचं ते पत्र…
या वादात आणखीन पेट आणणारा मुद्दा ठरला तो मंदिर संस्थानने पुजारी मंडळांना पाठवलेलं पत्र. या पत्रात आई तुळजाभवानीला भारतमाता आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी असं म्हटलं आहे. मात्र इतिहासात देवी तुळजाभवानीला भारतमाता म्हणून कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे हे पत्र देखील वादग्रस्त ठरलं आहे.
भोपी पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम यांनीही ‘तुळजाभवानीचं शिल्प मूळ ऐतिहासिक स्वरूपातच असलं पाहिजे. देविच्या अष्टभुजा रूपाला आमचा विरोध आहे, असं म्हणत इतिहासाशी छेडछाड नको… भवानी तलवार देतानाच मूळ शिल्प तयार करा, आम्ही यासाठी लढा देणार…’ अशी ठाम भूमिका मांडली आहे.
दरम्यान, मंदिर संस्थानचे विश्वस्त व भाजपा आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी वादावर प्रतिक्रिया देत हा वाद सामोपचाराने मिटवला जाईल, शिल्पाचं अंतिम स्वरूप कला संचालनालय ठरवेल असं स्पष्ट केलं.
17 जूनच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष…
दरम्यान पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी तुळजाभवानी मंदीर विकास आराखडाबाबत 17 जुन रोजी मुंबईत बैठक बोलावली असुन त्या बैठकीला भोपे, पाळीकर, उपाध्ये या तिन्ही पुजारी मंडळ आणि मठाचे महंतांसह इतरांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही.
मुळात श्री तुळजाभवानी मंदिर हे एक धार्मिक स्थळ आहे. श्री तुळजाभवानी माता, भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. श्री देविजच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडु व महाराष्ट्र राज्यासह लाखो भाविक कुलाचारांसह कुलधर्म करण्यासाठी तुळजापूर तिर्थक्षेत्र येथे येत असतात.
महाराष्ट्र शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने प्रस्तावित केलेल्या विकास आराखड्यास दिनांक 28 मे 2025 रोजी च्या शासन निर्णयानुसार 1865 कोटी रूपये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यान्वये रामदरा तलाव परिसरात श्री तुळजाभवानी आई छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याचे 108 फुटी शिल्प उभारणे प्रस्तावित आहे. याअनुषंगाने धर्मशास्त्र तसेच रुढी परंपरेनुसार सदर श्रीदेविजींची छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याचे शिल्प कसे असावे याबाबत कृपया, आपण आपला अभिप्राय कार्यालयास देण्याची विनंती तहसीलदार तथा मंदीर संस्थांनाचे प्रशासन व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी लेखी पत्रात केली आहे. तेव्हा आता या वादावर नेमका कोणता तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.