
सागर गायकवाड, झी मीडिया
Manikrao Kokate News: विधानसभेत रमी खेळण्यावरुन निर्माण झालेल्या वादामुळं आमदार माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. पुन्हा एकदा कोकाटे चर्चेत आले आहेत. माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांना मानहानीची नोटिस पाठवली होती. या प्रकरणाची आज सुनावणी पार पडली.
माणिकराव कोकाटी यांनी रोहित पवारांविरोधात नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी आज सुनावणी पार पडली. तेव्हा माणिकराव कोकाटे यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून म्हणणं मांडलं आहे. कोकाटे यांनी कोर्टात म्हटलं आहे की, त्यांना जंगली रमी खेळता येत नाही. मोबाईलवर जंगली रमीची जाहिरात आली होती. ती जाहिरात बंद करण्यासाठी 15-20 मिनिटे लागली, असं म्हणणं कोकाटेंनी न्यायालयात मांडलं आहे.
जाहिरात बंद करताना वेळ लागला. त्या दरम्यानचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी काढून ट्विटरवर शेअर केला आहे. या संदर्भात मी माध्यमांसमोर जाऊन संपूर्ण स्पष्टीकरण दिले, तरीही रोहित पवार यांनी ट्विट करणे थांबवले नाही. संबंधित व्हिडिओ विधान परिषदेमधील आहे; विधान परिषदेचे सदस्य नसताना आमदार रोहित पवार यांच्याकडे तो व्हिडिओ कसा पोहोचला याची चौकशी व्हावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे.
या व्हिडिओमुळे माझ्या पक्षाची, पक्षाच्या नेत्यांची आणि वैयक्तिक प्रतिमेची मोठी हानी झाली असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला आहे. मी आमदार रोहित पवार यांना नोटीस पाठवून त्या प्रकरणातील खुलासा मागवला होता. मात्र, रोहित पवार यांनी कोणतीही माहिती किंवा स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी माझी मागणी आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मला माझं कृषिमंत्री पद गमवावं लागलं, असा गंभीर आरोप कोकाटे यांनी न्यायालयात नोंदवला आहे.
माणिकराव कोकाटे यांचे विधीमंडळातच ऑनलाइन रमी खेळतानाचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून टीका करण्यात आली होती. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी सर्वप्रथम त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांना नोटिस बजावली होती. आठ दिवसात माफी मागण्याचा रोहित पवारांना इशार दिला होता. मात्र त्यांच्या या नोटिशीची पवारांनी खिल्ली उडवली होती. त्यानंतर मागील महिन्यातच कोकाटे यांनी रोहित पवार यांच्या विरोधात नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



