
Maharashtra weather news : उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका प्रचंड वाढत असतानाच आता ही थंडी मध्य भारतापर्यंत प्रभाव पाडताना दिसत आहे. देशात्या बहुतांश राज्यांमध्ये थंडीचा कडाका येत्या काही दिवसांमध्ये वाढत असून, बहुतांश शहरांमध्ये तापमानात घटसुद्धा नोंदवण्यात येत आहे. दरम्यान देशाचा दक्षिण भाग मात्र इथं अपवाद ठरत असून, दक्षिण भारताच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळू शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
महाराष्ट्रातही पावसाचं सावट?
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये थंडीचा कडाका वाढत असतानाच हवामानातील बदल आणि वाऱ्यांची बदललेली दिशा यामुळं 22 नोव्हेंबरनंतर मराठवाडा, विदर्भासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इथं मुंबईतही किमान तापमानाचा पारा 18 ते 22 अंशांदरम्यान असल्यानं गुलाबी थंडीनं शहरालाही हुडहूडी भरवली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.
हवामानाच्या या स्थितीमागचं कारण काय?
हिमालय आणि पर्वतीय क्षेत्रांमध्ये सातत्यानं होणारी बर्फवृष्टी, उत्तरेकडून सबंध देशात वाहणारे वारे आणि सध्या दक्षिणेकडील किनारपट्टी क्षेत्रावर निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा अन् चक्राकार वाऱ्यांची स्थिती, यामुळं राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये कमाल तापमान अद्यापही 30 अंशांच्या असल्यानं दुपारचा उकाडा अनेकांचीच होरपळ करताना दिसत आहे.
पुढच्या 24 तासांमध्ये राज्यात मराठवाड्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असून, इथं किमान तापमान 8 अंशांवर जाऊ शकतं. तर, पुणे, महाबळेश्वर, मालेगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम इथं थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्याचा पारा 10 अंश सेल्सिअसवर आला आहे. रात्रीसह दिवसासुद्धा येथील नागरिकांना थंडी जाणवत असल्यानं नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. तर शेतावर जाणारे शेतकरी देखील सूर्याचा पारा कधी चढतो याची वाट पाहूनच आपली कामे करत आहेत.
तापमान अंश सेल्सिअसमध्ये (कमाल/ किमान)
नाशिक – 27.7/ 9.6
निफाड- 28.8/8.3
सातारा- 29.7/ 11.9
महाबळेश्वर- 25.2/ 14.8
मुंबई- 32.7/ 18.9
रत्नागिरी- 34.0/ 18.1
अमरावती- 30.4/ 10.5
पर्वतीय राज्यांमध्ये थंडी धारण करणार रौद्र रुप?
केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीच्या प्राथमिक अंदाजानुसार देशातील पर्वतीय राज्यांमध्ये हिमवर्षावाचं सत्र सुरूच राहणार असून, यामध्ये काश्मीरचं खोरं, उत्तराखंडचा पर्वतीय भाह आणि हिमाचलमध्ये स्पितीटचं खोरं यासह इतर पर्वतीय भागांमध्ये तापमान उणेमध्ये जाऊन बर्फवृष्टीचा तडाखा बसणार आहे. ज्यामुळं मैदानी क्षेत्रांमध्येसुद्धा थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.
FAQ
महाराष्ट्रात सध्या थंडी आहे की पाऊस?
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांत थंडीचा जोरदार कडाका आहे. तर दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भात 22 नोव्हेंबरनंतर हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.
सर्वात थंड ठिकाणं कोणती?
मराठवाडा (किमान तापमान येत्या 24 तासांत 8° से पर्यंत जाऊ शकते)
भंडारा-गोंदिया (सध्या 10° से, दिवस-रात्र दोन्ही थंडी)
नागपूर, अमरावती, वाशिम, मालेगाव, पुणे, महाबळेश्वर – येथेही थंडी वाढणार.
मुंबईत थंडी जाणवते का?
होय, गुलाबी थंडी पूर्ण जोरात आहे. किमान तापमान 18-22° से दरम्यान आहे. सकाळ-संध्याकाळी हुडहुडी भरते, पण दुपारी अजूनही 30°+ कमाल तापमानामुळे उकाडा जाणवतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



