
Mumbai News: मुंबईतील कोस्टल रोडवर अलीकडे सुरू झालेला “मेलडी रोड” सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. गाड्या या मार्गावरील विशेष पट्ट्यांवरून गेल्या की ‘जय हो’ या गाण्याचे बोल ऐकू येतात. हा नवा प्रयोग पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असला, तरी ब्रीच कॅण्डी परिसरातील रहिवासी मात्र नाराज झाले आहेत. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्ग अर्थात मुंबई कोस्टल रोडवर विशेष तंत्रज्ञानयुक्त रंब्लर पट्टे बसवण्यात आले आहेत. वाहन ठरावीक वेगाने या पट्ट्यांवरून गेले की कंपन निर्माण होऊन ‘जय हो’ गाण्याची धून तयार होते. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कार्यक्रमाला उपस्थित होते. हा प्रयोग जगात 5 वा आणि भारतात 1 ला असल्याचे सांगितले जात असून या प्रकल्पाची भारतात नाही तर जगभर चर्चा आहे.
रहिवाशांचा वाढता आक्षेप
सतत वाजणाऱ्या आवाजामुळे दैनंदिन आयुष्य विस्कळीत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत स्थानिक रहिवासी संघटनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ब्रीच कॅण्डी येथील रहिवासी संघटनेने तक्रार करताना सांगितले की, हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी स्थानिकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परिसरात शाळा आणि रुग्णालये असल्याने शांततेची गरज असते. मात्र गाड्या सतत धावत असल्याने गाण्याची धून वारंवार ऐकू येते. संघटनेच्या प्रतिनिधी नंदिता छाब्रिया यांनी सांगितले की यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे, विशेषतः रात्रीच्या वेळी आवाज अधिक जाणवतो.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची भूमिका
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले की, या संगीत मार्गावरील ध्वनी पातळी कमी ठेवण्यात आली आहे आणि मुख्यत्वे तो वाहनातील प्रवाशांनाच ऐकू येतो. तरीही रहिवाशांना अडचण होत असेल तर त्यांची बाजू ऐकून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका प्रशासनानेही तक्रारीची नोंद घेतली असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा: अजित पवारांसोबत विमानात असणाऱ्या ‘त्या’ 4 मोबाईलचं काय झालं? रोहित पवारांनी केला खुलासा
सध्या हा प्रकल्प आकर्षण आणि त्रास या दोन टोकांमध्ये अडकला आहे. काहींना तो पर्यटनासाठी वेगळा अनुभव वाटत असताना स्थानिक रहिवासी शांततेचा प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तांत्रिक बदल करणार का किंवा वेळेचे निर्बंध आणणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात यावर ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



