
महाशिवरात्रीनिमित्त पुणे येथील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंडी साकारण्यात आली. बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजित या ‘चक्केश्वराच्या पूजे’साठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या पिंडीसोबतच बदाम, मनुके, द्राक्षे यांसह विविध फळे आणि फुलांनी सजावट करण्यात आली होती. तसेच, लीना भागवत, लता आणि प्रमोद भगवान यांनी जागेवरच तयार केलेला उमा शंकराचा रेखीव चक्क्याचा मुखवटा हे विशेष आकर्षण ठरले. मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांची चित्रेही लावण्यात आली होती. प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्नाली पंडित, राघवेंद्र उर्फ बापू मानकर आणि कुणाल टिळक यांच्या हस्ते नितीन पंडित यांच्यासह आरती करण्यात आली. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, विश्वस्त सुनील रुकारी आणि राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते. पुरुषोत्तम वैद्य गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेकरी उमेश धर्माधिकारी, प्रताप बिडवे, अशोक दोरुगडे, शोभा गादेकर, नंदकुमार चिप्पा, वैभव निलाखे आणि वासंती घडशी यांनी अवघ्या दोन तासांत ही चक्क्याची शंकराची पिंडी आणि संपूर्ण आरास साकारली. सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून ही चक्केश्वराची पूजा तयार करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की, दत्तमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त चक्केश्वराची पूजा केली जाते. यावर्षी १०१ किलो चक्का वापरून शंकराची पिंडी साकारण्यात आली. भगवान शंकराच्या मुखवट्याची प्रतिकृती आणि बारा ज्योतिर्लिंगांची चित्रे यामुळे भक्तांना एकाच ठिकाणी दर्शन घेता आले. या चक्क्याचे श्रीखंड करून मंदिरातील भक्तांना आणि सामाजिक संस्थांना वाटप केले जाईल. ॲड. कदम जहागिरदार यांनी २०२२ मधील महाशिवरात्रीची आठवण करून दिली, जेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री दत्त मंदिरात ही पिंडी साकारण्यासाठी स्वतः सहभाग घेतला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



