
पुण्यात दहावी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आधीच मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी एका १८ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील चैतन्य विनोद शेंडे असे आरोपीचे नाव असून, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली असून, तपासात आरोपी टेलिग्रामद्वारे विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुढील तपासासाठी आवश्यकता भासल्यास पुन्हा पोलीस कोठडी रिमांड मिळवण्याच्या अटीवर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने “महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६ पेपर्स” या नावाने टेलिग्रामवर एक ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा काही तास आधी उपलब्ध करून देण्याचा दावा केला जात होता. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले जात असे. तांत्रिक तपासणीत असे आढळून आले की, आरोपी टेलिग्राम ग्रुपवर पीडीएफ फाईल अपलोड करत असे. या फाईलला पासवर्ड ठेवून पेपर पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून क्यूआर कोड किंवा यूपीआयद्वारे पैसे मागितले जात होते. पैसे भरल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रुपमधून ब्लॉक केले जात असे, ज्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक होत होती. या फसवणुकीची पद्धत अत्यंत चलाखीची होती. आरोपी आधीच एक पीडीएफ फाईल अपलोड करत असे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष परीक्षा झाल्यानंतर त्याच फाईलमध्ये खरा प्रश्नपत्रिका मजकूर टाकून ती संपादित करत असे. फाईलची अपलोड केलेली वेळ मात्र बदलत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ती आधीच अपलोड केल्याचा भास होत असे आणि त्यांना संशय येत नव्हता. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभागीय मंडळाचे अधिकारी चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर (वय ५३) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २२३, ३(५) तसेच महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळ व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम १९८२ चे कलम ६ व ७ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ व ७२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



