
Supriya Sule on Ajit Pawar Demise and Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आलेला असतानाच चर्चेत असणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घचनेक ओढावलेला मृत्यू. अतिशय भीषण अपघातात झालेल्या त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य हळहळलं. अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी नुकतंच त्यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी काही शंका उपस्थित केल्या. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रोहित पवारांनी उपस्थित केल्याच्या या प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबातील एक सदस्य म्हणून प्रतिक्रया दिली. यावेळी शरद पवारांची प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
‘रोहितची अस्वस्थता सहाजिक असून, मुलांना अनेक प्रश्न पडतात त्याची उत्तरं सापडत नाहीत. त्यानं जे प्रश्न मांडले, त्यातून आपण दादांना वाचवू शकलो असतो का? हा प्रश्नही होता. त्यानं त्याची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यानंतर वक्तव्य केलं आहे की ते या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतील आणि पारदर्शक चौकशी होईल असं म्हटलं’, त्यामुळं आपण या चौकशीपर माहितीची प्रतीक्षा करू असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
‘तो जिथंकुठं आहे…’, अजित पवारांविषयी असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे?
अजितदादा नसल्याचं मोठं दु:ख असून, कुटुंब या दु:खातून जात आहे, असं सांगताना अजित पवारांची जागा कोणी घेऊ शकत नाही असं म्हणत सध्या आपल्या कुटुंबात सर्वांच्याच मनात ‘एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू’, अशा भावना असल्याचं त्या म्हणाल्या..
अजित पवारांच्या निधनानंतर जवळच्या व्यक्ती असल्याचं म्हणवणाऱ्यांमध्ये अपघात, चौकशीची मागणी याबाबत फार ठाम भूमिका पाहायला मिळत नसल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, ‘या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. मी जे वर्तमानपत्रात वाचलं, कुटुंबात जी चर्चा झाली आहे ते पाहता कुटुंब अतिशय अडचणीच्या काळातून जात आहे. आम्ही एकमेकांना आधार देत पुढे जात आहोत इतकंच सांगेन’, असं म्हणत या प्रश्नालाच बगल दिली.
अंकुश काकडेंचं सोशल मीडिया स्टेटस आणि 12 फेब्रुवारीच्या विलिनीकरणाच्या चर्चांबाबत विचारताच, ‘आज दादा नाही त्यामुळे जुनं उणधुणं काढायचं नाही, दादा होता त्यामुळे त्याच्यात आणि माझ्यात काय चर्चा झाली हे त्याला तो जिथंकुठं आहे त्याला माहितीये. त्यामुळं दादाची इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढेपुढे पाहू’, अशा शब्दांत उत्तर दिलं.
‘ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. माझं दादाशी जे बोलणं झालं ते मी बोलते, आज माझा भाऊ नाही’ याचाच पुनरुच्चार करत विलिनीकरणावरून होणाऱ्या चर्चांवरही भाष्य केलं. तुम्ही एनडीएत जाणार का? हा प्रश्न आणि चर्चांवर, ‘ही लोकशाही असून प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहितीयेत. पण अनेकांना मी हे बोललेलं आवडत नाही. आज माझा भाऊच राहिलेला नाही, दादा आणि माझ्यातील बोलणंच वास्तव होतं. माझा भाऊ जाऊन 15 दिवसही नाही झाले, त्या धक्क्यातून आम्हाला बाहेर तर येऊ द्या’, अशीच भूमिका मांडली.
दादा गेल्याच्या दिवशीच विलीनीकरणाची चर्चा सुरू केली अशा चर्चा झाल्या, नेते असं काही नेते म्हणाले, ज्यावर प्रतिक्रिय़ा देताना ही लोकशाही असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे अशा माफक शब्दांत सुळेंनी आपलं मत मांडलं. दरम्यान अजित पवारांचं निधन आणि त्यानंतर शरद पवारांचं प्रकृती अस्वास्थ्य पाहता पंतप्रधान मोदीजी, राजनाथ सिंह, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या अनेकांचे फोन आले, महाराष्ट्रातूनही साऱ्यांनी कुटुंबाला आधार दिला याबद्दल सुप्रिया सुळे यांनी साऱ्यांचेच मनापासून आभारही मानले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



