
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नाशिकच्या भोंदू अशोक खरात व त्याच्या नादाला लागलेल्या राजकारण्यांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एआयमुळे रोजगाराचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत असताना आपले नेते व राज्यकर्ते भोंदूबाबाच्या व त्याच्या ओश्नो जलाच्या चक्रात अडकलेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल, असे ते म्हणालेत. नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राज्य महिला आयोगाच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण आपल्या वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल रोहित पवार म्हणाले, आजच्या AI च्या जमान्यात आहे त्या नोकऱ्या टिकवणं कठीण होत असताना नव्याने पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या 30 टक्के तरुणांना AI मुळं नोकरीही मिळणार नसल्याचं भाकित ServiceNow चे CEO Bill McDermott यांनी केलं. या गंभीर परिस्थितीवर मार्ग काढण्याऐवजी आपले नेते आणि राज्यकर्ते एखाद्या भोंदू बाबाच्या आणि त्याच्याकडून पिण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘ओश्नो जला’च्या चक्रात अडकत असतील तर युवा शक्ती ज्या बेरोजगारीच्या दुष्टचक्रात अडकत चाललीय त्यांना कोण सोडवणार? कधीकाळी देशाला विचार आणि दिशा देणाऱ्या महाराष्ट्रातील नेते आज दिशाहिन होऊन बाबाबुवा, तंत्र-मंत्र आणि तोडगे यात गुरफटत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल. सुनेत्राकाकी पवारांनी काळजी घ्यावी उल्लेखनीय बाब म्हणजे रोहित पवार यांनी शुक्रवारी या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व त्यांच्या दोन्ही मुलांना सावध राहण्याचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते. नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. मा. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही, असे ते म्हणाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



