
सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी सिंचन विहीर गैरव्यवहार प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात उर्वरीत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलिस अधिक्षक काय भुमीका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये सिंचन विहीरीचे काम न करताच अकुशलचा निधी उचलण्यात आल्याचे महसूल विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आणखी काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर ७ पैकी ४ ठिकाणी विहीरीचे कामच झाले नसल्याचे दिसून आले असून यामध्ये ५.७६ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एका विहीरीच्या प्रकरणात सेनगाव पोलिस ठाण्यात पालक तांत्रिक अधिकारी के. बी. देशपांडे व ग्रामरोजगार सेवक मनोज खडसे याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणात शेतकरी श्रीराम जगताप, रामचंद्र खडसे, यमुनाबाई जगताप, इंदुबाई खडसे, राधाबाई होळपादे, गणेश रवणे, एकनाथ कोल्हे यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे मंगळवारी ता. १० निवेदन सादर केले आहे. सिंचन विहीर गैरव्यवहार प्रकरण गंभीर असून शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारे आहे. या प्रकरणातील मुख्य संशयीतावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचे मोठे रॅकेट बाहेर पडलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देऊन या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणात इतर दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांची चौकशी झाल्यास आणखी प्रकरणे उघडकीस येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आता पोलिस अधिक्षक कार्यालय काय भुमीका घेणार याकडे सेनगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे. विहीर आत्मक्लेश आंदोलन करणार याप्रकरणाच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अन्यथा ता. १३ मार्च रोजी सेनगाव तालुक्यातील कोणत्याही विहीरीमध्ये उतरून विहीर आत्मक्लेस आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



