
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळ्यावरुन भारतीय जनता पार्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केल्यानंतर आता भाजपाने यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे माजी प्रमुख आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर त्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरुन टीकास्र सोडलं आहे. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंनी भाषणात मांडलेल्या अनेक मुद्द्यावरुन उत्तर देताना ठाकरेंना थेट इशाराच दिला आहे.
दमलेल्या आदित्यच्या बाबाची कहाणी
आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन, “मुंबईकर हो, आणीबाणीला पाठिंबा देणारे आज लोकशाहीवर गप्पा मारत आहेत ऐकलेत ना भाषण?” असं आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे. तसेच पुढे, “श्रीमान उद्धव ठाकरे… मोदींजींना महाराष्ट्रावर नाही, खरे तुम्हाला मुंबईवर सूड घ्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरचा दसरा मेळाव्यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण म्हणजे अंगार असायचे. आजचे भाषण म्हणजे खचलेल्या, हरलेल्या, पराभव मान्य केलेल्या दमलेल्या आदित्यच्या बाबाची कहाणी होती!” असं म्हणत उद्धव ठाकरेंवर आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. “शेवटी ज्वलंत परंपरेचा “चिखल” केलात तुम्ही!” असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर राहण्यासाठी…
इतक्यावरच न थांबता आशिष शेलार यांनी, “धमक्या कुणाला देता?” असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज केलं आहे. “मुंबईकर तुम्हाला ओळखून आहे… मराठी माणूसच तुम्हाला अद्दल घडविण्यासाठी आतूर आहे. बाकी आमच्या नेत्याच्या क्रमांकाची चिंता करु नका. मुंबईत कोरोनात लोकं मरत असताना तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर राहण्यासाठी किती आणि कसा पैसा खर्च केलात, याची यादी देण्याची पाळी आमच्यावर आणू नका…. समजनेवाले को इशारा काफी है!” असं शेलार यांनी त्यांच्या पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
मुंबईकर हो,
आणीबाणीला पाठिंबा देणारे आज लोकशाहीवर गप्पा मारत आहेत ऐकलेत ना भाषण ?श्रीमान उद्धव ठाकरे…
मोदींजींना महाराष्ट्रावर नाही, खरे तुम्हाला मुंबईवर सूड घ्यायचा आहे.छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरचा दसरा मेळाव्यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण म्हणजे अंगार…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 2, 2025
शिंदेंनीही उद्धव ठाकरेंना सुनावलं
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या क्रमांकावरून टीका केली. या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या भाषणातून उत्तर दिलं. “आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लोकप्रियतेच्या नंबरवरून टीका केली. फडणवीसांचे वरून तरी खाली नंबर आला पण तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमचा खालून नंबर 1 आला. ते विसरलात का?” असा टोला शिंदेंनी लगावला. तसेच पुढे, “कोणावर टीका करताना किती वेळा रंग बदलणार. आजपर्यंत अशा प्रकारचा सरडा मी कधी पाहिला नाही. जो काही वेळातच रंग बदलतो,” अशी घणाघाती टीकाही शिंदेंनी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.