
धुरंधर चित्रपटात दिसलेला अभिनेता नदीम खानला मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सोमवारी समोर आलेल्या वृत्तानुसार, ४१ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली आहे. महिलेचा आरोप आहे की, अभिनेत्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा अभिनेत्याने लग्नास नकार दिला, तेव्हा महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत महिलेने सांगितले की, ती सुमारे दहा वर्षांपूर्वी नदीम खानच्या घरी काम करू लागली होती आणि २०१५ मध्ये दोघांमध्ये जवळीक वाढली. आरोपीने कथितरित्या लग्नाचे वचन दिले होते, परंतु वेळ निघून गेल्यानंतरही ते वचन पूर्ण झाले नाही. सुरुवातीला हा गुन्हा वर्सोवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, जो नंतर मालवणी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. मालवणी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “महिलेच्या जबाबाच्या आधारे अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. आरोपांची चौकशी सुरू आहे.” सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कोण आहेत नदीम खान? नदीम खान गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी टीव्ही, चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम केले आहे. मात्र, ते बहुतेकदा सहाय्यक भूमिकांमध्येच दिसले आहेत. अभिनयासोबतच नदीम थिएटरशीही जोडले गेले आहेत आणि त्यांनी अनेक स्टेज प्लेमध्ये परफॉर्म केले आहे. नदीम यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन, असरानी, आदिल हुसैन आणि संजय मिश्रा यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम केले आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या कलाकारांसोबत अनेक थ्रोबॅक फोटो आहेत. त्यांनी मिमी, वध, मुखबिर: द स्टोरी ऑफ ए स्पाई, मिसेस सीरियल किलर आणि धडक यांसारख्या चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. नदीम खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, तो नुकताच आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटात रहमान डकैतच्या आचारी अखलाकच्या भूमिकेत दिसला होता. नीना गुप्ता आणि संजय मिश्रा लवकरच ‘वध 2’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 2022 मध्ये आलेल्या ‘वध’ चित्रपटाचा सिक्वेल आहे आणि 6 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited



