
Maharashtra
-Pritesh Suryawanshi
राज्यातील राजकारणात सध्या अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याभोवती वादाचे मोहोळ निर्माण झाले असून त्यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार असल्याचे चित्र दिसत आहे. एका वादग्रस्त व्हिडिओमुळे चर्चेत आलेले झिरवाळ यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ‘प्री-कॅबिनेट’ बैठकीलाही दांडी मारली. झिरवाळ यांच्यासह सातारा प्रकरणावरून नाराज असलेले मकरंद पाटील आणि इतर काही आमदारही या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

या सर्व वादाच्या केंद्रस्थानी असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यात झिरवाळ तृतीयपंथी पवन यादव याच्यासोबत मद्य आणि खाद्यपदार्थांच्या मैफिलीत दिसत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले असून, पवन यादव याच्या तक्रारीवरून त्याच्याच भावाविरुद्ध कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफडीए विभागात नोकरी लावून देण्यासाठी मंत्र्यांसोबतचा व्हिडिओ एडिट करून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
एकिकडे झिरवाळ यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठत असताना आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच, पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना त्यांनी मारलेली दांडी बरेच काही सांगून जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि आदिती तटकरे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते, मात्र झिरवाळांच्या अनुपस्थितीमुळे पक्ष आता त्यांच्यावर कारवाई करणार की त्यांना पाठबळ देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच या ‘व्हायरल’ प्रकरणामुळे झिरवाळांची राजकीय अडचण वाढली असून, त्यांची विकेट पडणार की ते या संकटातून सावरणार, हे येणारा काळच ठरवेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



