
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात आज दुपारी 3:25 च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज आणि जामखेड या गावांना याचा प्रामुख्याने फटका बसला आहे. भूगर्भातून अचानक मोठा आवाज येत जमीन हादरल्याचा अनुभव ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची तातडीने दखल घेत प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला असून, कोणतीही हानी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुखेड तालुक्यात आज, 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3:25 च्या सुमारास 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे अतिसौम्य धक्के जाणवले असून, याचा केंद्रबिंदू खपराळ गावाजवळ असल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने केली आहे. हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज आणि जामखेड या भागांतील ग्रामस्थांनी भूगर्भातून आवाज येत जमीन हादरल्याची माहिती प्रशासनाला दिली होती. सुदैवाने, यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याची अधिकृत माहिती मुखेड तहसीलदारांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राला दिली असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाच्या धक्क्यांनंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले असून सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. ज्यांच्या घरांना पत्र्याचे छत आहे, त्यांनी सुरक्षेसाठी पत्र्यांवरील दगड तातडीने काढून ते बोल्टने घट्ट बसवून घ्यावेत आणि पुन्हा भूगर्भातून आवाज किंवा धक्का जाणवल्यास तात्काळ घराबाहेर मोकळ्या जागेत जमा व्हावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि माहिती देण्यासाठी किंवा मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



