
Explained What Nitesh Rane Said His Baap Comment: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ‘बाप काढण्यावरुन’ वादाला तोंड फुटलं आहे. महायुतीमधील मित्र पक्षांवरच भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी जाहीर सभेमधून केलेल्या वक्तव्याचे पडसाद कॅबिनेटच्या बैठकीमध्येही उमटल्याचं पाहायला मिळालं. या विधानावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच स्वत: स्फोटक विधानांमुळे चर्चेत असलेले नितेश राणेंचे वडील खासदार नारायण राणेंनीही मुलाचे यावरुन कान टोचले आहेत. मात्र नितेश राणेंनी नेमकं कुठे आणि काय म्हणाले याबद्दल अनेकांना संभ्रम आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजाकरणात सध्या सुरु असलेलं हे ‘बाप’ प्रकरण काय आहे ते पाहूयात…
मित्रपक्षांवरच घसरले नितेश राणे
नितेश राणे हे मंत्री झाल्यापासून विरोधकांवर तुटून पडताना दिसत आहे. ते हिंदुत्वाचा मुद्दा ठामपणे मांडताना दिसत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सभा, भाषणं आणि कामानिमित्त फिरताना ते आपल्या विधानांच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. मात्र आता नितेश राणेंचीही हीच तोफ सत्ताधाऱ्यांकडे वळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नितेश राणेंनी केलेल्या ‘बापा’संदर्भातील विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा धुरळा उठला आहे. नितेश राणे नेमकं काय म्हणाले हे जाणून घेण्याआधी त्यांच्या विधानावर त्यांच्या वडिलांनी धारशीवमध्ये पत्रकारांशी बोलताना आज (11 जून रोजी) काय प्रतिक्रिया नोंदवली ते पाहूयात….
नारायण राणे मुलाच्या विधानाबद्दल काय म्हणाले
पत्रकारांनी नितेश राणेंच्या विधानाबद्दल विचारलं असता नारायण राणेंनी, “मुख्यमंत्री हा कुणाचा बाप असतो हे वक्तव्य चुकीचं आहे. मी नितेशला समज दिली आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा,” असं उत्तर देत मुलाला समज दिल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनीही फटकारलं
केवळ वडीलच नाही तर स्वत: मुख्यमंत्र्यांनीही नितेश राणेंना फटकारलं आहे. पत्रकारांसमोर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, “कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे,” अशी भूमिका मांडली. मात्र त्याचवेळी नितेश राणेंच्या विधानाचा विपर्यास केल्याचा संदर्भही त्यांनी दिला. “मी देखील संबंधित मंत्र्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वत: सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात काही अर्थ नसला तरी पर्सेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
नितेश राणे काही दिवसांपूर्वी धाराशीव दौऱ्यावर होते. तेथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी केलेल्या विधानावरुनच हा सारा वाद झाला आहे. कार्यकर्त्यांसमोर दिलेल्या भाषणामध्ये नितेश राणेंनी, “भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने नेहमी एक लक्षात ठेवावं, देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. कोणी कितीही इकडे तिकडे नाचले, कोणी कितीही इकडे तिकडे ताकद दाखवली तर शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं,” असं विधान केलेलं. यावरुनच आता नितेश राणे एकटे पडल्याचं दिसत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.