
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच आता या प्रकरणाला नवं राजकीय वळण मिळालं आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषद सदस्य नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोऱ्हे या गेल्या काही वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात होत्या आणि राजकीय फायद्यासाठी त्याला भेटत असल्याचा दावा देसाईंनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तृप्ती देसाई यांच्या मते, नीलम गोऱ्हे या मागील पाच ते सहा वर्षांपासून खरातकडे जात होत्या. त्यांनी आमदारकी किंवा मंत्रीपदासाठी त्याची मदत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणाऱ्या गोऱ्हे या खरात प्रकरणावर शांत का आहेत? असा सवाल उपस्थित करत देसाईंनी त्यांच्या आणि खरातमधील संबंधांवर संशय व्यक्त केला. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील खरातच्या कार्यालयातही गोऱ्हे नियमितपणे जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याचबरोबर, देसाईंनी आणखी एक धक्कादायक दावा करत सांगितले की, नाशिकमधील एका पाचतारांकित हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली होती. पाथर्डी परिसरातील हॉटेलमध्येही खरात गोऱ्हेंना भेटण्यासाठी गेला होता, असे त्यांनी नमूद केले. या भेटीमागे काही आर्थिक व्यवहार होते का किंवा इतर काही संबंध होते का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे देसाईंनी स्पष्ट केले. तसेच, 39 आमदारांपैकी गोऱ्हे या खरातला भेटायला जात होत्या, असा आरोपही त्यांनी केला आहे. तृप्ती देसाई यांनी पुढे म्हटले की, गोऱ्हे या भविष्य जाणून घेण्यासाठी खरातकडे जात होत्या. ज्या कार्यालयात अनेक महिलांवर अत्याचार झाल्याचे आरोप आहेत, त्याच ठिकाणी गोऱ्हे गेल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढते, असे त्यांनी सांगितले. गेल्या सात ते आठ वर्षांपासून गोऱ्हे यांची खरातशी ओळख असल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू दरम्यान, या आरोपांमुळे नीलम गोऱ्हे यांच्याभोवतीचा राजकीय वर्तुळ अधिकच तापले आहे. विशेष तपास पथकाकडून आधीच खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असताना आता या नव्या आरोपांमुळे तपासाचा कक्षा वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात या प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, गोऱ्हे यांच्यावरही चौकशीची मागणी जोर धरत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



