
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरलेला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी खरातचे धागेदोरे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी जोडले असून, यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. “अजितदादांच्या निवासास्थानाजवळ झालेली अघोरी पूजा आणि त्यांचा अपघात यांचा काही संबंध आहे का?” असा खळबळजनक सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले की, “अशोक खरातचे कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणारे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अजितदादांच्या निवासस्थानाजवळ आणि कार्यालयाजवळ अघोरी पूजा करण्यात आली होती. तसेच सप्टेंबर महिन्यात ‘करंगळी कापण्याचा’ एक प्रकार झाला होता, जो अघोरी कृत्यांचाच भाग होता. या सर्व घटना आणि दादांचा अपघात यात काही साम्य आहे का? याचा तपास होणे गरजेचे आहे.” खरातला ज्या तत्परतेने अटक केली, तशीच तत्परता अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीत का दाखवली जात नाही? असा सवालही त्यांनी केला. अशोक खरातच्या संपत्तीचा स्रोत काय? अशोक खरातच्या अवाढव्य मालमत्तेवर बोट ठेवत अमोल मिटकरी म्हणाले, “एका साध्या भोंदू बाबाकडे २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती येते कुठून? यामागे कोणते अधिकारी आणि मंत्री आहेत, हे आता समोर आले पाहिजे. खरातचे एका व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबतही संबंध असल्याचा संशय असून, यामध्ये अनेक साक्षर लोक आणि अधिकारी आहारी गेले आहेत, हे राज्याचे दुर्दैव आहे. पोलिसांना मिळालेले व्हिडिओ ५७ नाहीत, तर ५०० पेक्षा जास्त असू शकतात, असा आमचा अंदाज आहे.” ज्यांना दादांनी मोठं केलं, ते अधिवेशनात गप्प का? पक्षांतर्गत आणि महायुतीमधील राजकीय स्थितीवर भाष्य करताना अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली. “अजितदादा हे शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचे नेते आहेत, मात्र त्यांना संपवण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात दादांच्या अपघाताच्या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही. ज्यांना दादांनी मोठे केले, ते आज मूग गिळून गप्प का आहेत?” असा टोला त्यांनी स्वपक्षीय आणि मित्रपक्षातील नेत्यांना लगावला. अंनिस आणि सरकारी भूमिकेवर प्रश्न राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असतानाही असे प्रकार उघडपणे कसे घडतात, यावर अमोल मिटकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “खरातला कोणाच्या काळात पाणी आरक्षित करून मिळाले आणि त्याला कोणकोणत्या मंत्र्यांचे सहकार्य लाभले, याची सखोल चौकशी व्हावी. महायुती असो वा महाविकास आघाडी, जो कोणी दोषी असेल त्याला सरकार पाठीशी घालणार नाही, असा मला विश्वास आहे,” अशी आशाही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



