
Pandharpur News : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर पालिकेने स्वच्छतेच्याबाबतीत आक्रमक प्रवित्रा घेतला आहे. आषाढी वारीच्या दिवसांमध्ये पंढरपुरात रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका आणि शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा पालिकेकडून इशारा देण्यात आला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी ही माहिती दिली आहे. आषाढी सोहळ्यासाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांचे आरोग्य चांगले रहावे त्यासोबतच आपले शहर स्वच्छ राहावे यासाठी सर्व भक्तांनी आणि शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
आषाढी वारी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असतात. या सोहळ्यानिमित्त भाविकांचे, वारकऱ्यांचे दशमी, एकादशी व व्दादशी असे तीन दिवस पंढरपुरात वास्तव्य असते. त्यामुळे पंढरपुरात आलेल्या वारकरी, भाविकांचे या तीन दिवसांमध्ये आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. यासाठी पंढरपूर नगरपालिका स्वच्छता मोहीम राबवत आहे. आषाढी वारीच्या वेळी शहरातील नागरिक, दुकानदार, व्यावसायिक, मठधारक, किरकोळ विक्रेते हे रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, तसेच उघड्यावर लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर विधी करतात. जर असे करताना आढळले तर आता पालिका त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहे.
पंढरपूर नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन
पंढरपूर नगरपरिषदेने जाहीर केलेल्या सूचनेद्वारेकेंद्र शासनाच्या अधिसूचना क्रमांक एस.ओ.1357 (3) नुसार घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी शहरांमध्ये प्रभावीपणे चालू आहे. दंड वसूल करण्यासाठी आरोग्य निरीक्षक, मुकादम, प्राधिकृत केलेले कर्मचारी यांना अधिकार देण्यात येत आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत वारकरी, भाविक यांनीही कचरा कोठेही रस्त्यावर टाकू नये. नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जवळपासच्या कचराकुंड्यामध्येच कचरा टाकावा, असे आवाहन महेश रोकडे यांनी येणाऱ्या भाविकांना आणि शहरातील नागरिकांना केलं आहे.
असा असेल दंड
रस्त्यावर कचरा टाकणे – 180 रुपये दंड
कचरा जाळणे – 5 हजार रुपये दंड
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- 150 रुपये दंड
उघड्यावर लघुशंका करणे – 1 हजार रुपये दंड
उघड्यावर शौच करणे – 500 रुपये दंड
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.