
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या विठुरायाची भेटीच्या ओढीने लाखो भाविक दर आषाढी एकादशीपूर्वी वारीला निघतात. यंदा आषाढी एकादशी 6 जुलैला असून वारकरी आणि पालख्या विठ्ठलाच्या भेटीला निघाले आहेत. युगानुयुगे कंबरेवर हात ठेवून उभा असलेला विठोबाला भेटण्यासाठी संत नामदेव, गोरोबा, चोखोबा, एकनाथ महाराज, तुकोबा यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. अशा या विठुरायावर आजवर कोणाची वाकडी नजर कधी पडली नाही. पण तुम्हाला माहितीये का औरंगजेबाने पंढरपूरजवळ हल्ला केला होता तेव्हा विठ्ठलाची मूर्ती कुठे लपवली होती?
विठ्ठलाची मूर्ती कुठे लपवली होती?
1659 मध्ये हिंदवी स्वराज्यावर आदिलशाहीचा क्रूर सरदार अफजल खान चालून आला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोऱ्यातल्या प्रतापगडावर आश्रय घेतला होता. अजिंक्य असलेल्या या प्रतापगडाला जिंकणे आणि जावळीच्या घनदाट जंगलात शिरणे शक्य नव्हते. तेव्हा अफजल खानने हा विडा उचलला आणि शिवरायांना प्रतापगडावरून बाहेर काढण्याचा निर्धार केला. अफझलखानाने सर्वप्रथम तुळजापुरावर हल्ला केला आणि तिथली मूर्ती भंजन केली. त्यामुळे आता अफजल खान पंढरपूरकडे कूच करणार हे लक्षात आलं होतं. आता आपल्या विठुरायावर संकट येणार हे लक्षात आल्यानंतर त्यांना हलवणे गरजेचे होतं. अशात विठुरायाची मूर्ती पंढरपुरातून रातोरात हलवली.
या घटनेनंतर जवळपास दहा पंधरा वर्षे विठोबाची मूर्ती पंढरपुराच्या बाहेर होती. या काळात मूर्तीचा प्रवास देगाव, चिंचोली, गुरसाळे या गावांमध्ये झाला असल्याचं सांगितलं जातं. याचं नेमकं पुरावे सध्या उपलब्ध नाहीत मात्र जेष्ठ इतिहासकार राजवाडे यांच्या मते अखेरीस ही मूर्ती माढ्याला हलवण्यात आली. सर्व संकटे दूर झाल्यावर पांडुरंगाची मूर्ती परत पंढरपुरात मंदिरात स्थापन झाली.
काही संशोधक दावा करतात की, माढ्याच्या मंदिरातील मूर्ती हीच पांडुरंगाची मूळ मूर्ती आहे. याबद्दल मात्र अनेक प्रश्न चिन्ह आहेत. या काळात पंढरपुरापासून वीस मैल अंतरावर भीमा नदीच्या तीरावर असलेल्या बेगमपुरा (ब्रम्हपुरी) येथे मुघल सम्राट औरंगजेबाची छावणी वसली होती. औरंगजेबाची कीर्ती कट्टर धर्माभिमानी आणि हिंदूद्वेष्टा अशी होती. भारतभरात अनेक मंदिरांचा त्याने नाश केला होता. औरंगजेबापासून विठुरायाच्या मूर्तीचे रक्षण करण्यासाठी तिथल्या गोपाळ विठ्ठल बडवे यांनी ही मूर्ती देगावच्या पाटलांना दिली. अशा संकटाची पूर्व कल्पना असल्यामुळेच की काय पण देगावच्या जिवाजी आणि सूर्याजी पाटलांना छत्रपती राजाराम महाराजांनी अभय पत्र दिलेलं होतं.
यामुळेच पंढरपूरच्या बडव्यांनी विठुरायाची मूर्ती सूर्याजी पाटलांच्या हवाली केली. त्यांनी ती मूर्ती आपल्या शेतातल्या विहिरीत लपवली. पुढे 1699 साली औरंगजेबाने पंढरपुराजवळून आपली छावणी हलवली. तेव्हा देगावच्या पाटलांनी देवाची मूर्ती पंढरपूरला परत आणली. मात्र पाटलांनी आम्ही तुम्हाला मूर्ती परत करत आहोत मात्र मूर्ती ताब्यात घेण्यापूर्वी तसे कागदावर लिहून द्या असे तिथल्या बडव्यांना सांगितलं.
11 ऑक्टोबर 1699 रोजी हे कागदपत्र होऊन त्यावर नारो गोविंद बडवे, गोपाळ विठ्ठल बडवे आणि इतर पाच बडव्यांनी या कागदावर सह्या केल्या. हा कागद मिळाल्यावर सूर्याजी पाटलांनी विठोबाची मूर्ती बडव्यांकडे सुपूर्द केली. यानंतर विठुरायाच्या मूर्तीची पंढरीच्या मंदिरात पुनरप्रतिष्ठापणा करण्यात आली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांची मराठी राजवट सुरू झाली. तेव्हापासून कधी विठोबाची मूर्ती हलवण्याची गरज भासली नाही. दरम्यान या सगळ्याबद्दल कोणताही दावा किंवा पुरावा इतिहासात उपलब्ध नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.