
Crime News Husband Killed Wife: नाशिक आणि बार्शीमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जोडीदारानेच आपल्या पत्नीला संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये पतीने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केली आहे. या घटनाचा सविस्तर तपशील समोर आला असून नाशिकमधील मयत दांपत्य निवृत्त शिक्षक आहेत. तर बार्शीमधील पतीने घरासमोरील बदामाच्या झाडाला लटकून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नेमकं घडलं काय आणि सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊयात…
किरकोळ कारणावरुन पती-पत्नीमध्ये वाद
बार्शीमध्ये किरकोळ वादातून पतीने पत्नीचा खून केला आणि त्यानंतर पतीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना शेलगाव आरमध्ये घडली आहे. मयत पतीचं नाव वसंत पवार असं असून त्याच्या पत्नीचं नाव आयनाबाई उर्फ सोनाबाई पवार असं आहे. वसंत पवारला दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नीसोबत किरकोळ भांडण विकोपाला जायचे.
पत्नीचा जागीच मृत्यू तर वडीलांचा हात फ्रॅक्चर अन् त्यानंतर…
मंगळवारी रात्री दारू पिऊन आल्यानंतर वसंतने पत्नी सोनाबाई आणि वडील अंबादास यांना किरकोळ कारणावरून लाकडी दंडुक्याने मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये सोनाबाईला डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागल्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तर वसंतचे वडील अंबादास यांचा हात या मारहाणीमध्ये फॅक्चर झाला. वसंत पवारने सकाळी घरासमोरील बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. वैराग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
78 वर्षीय माजी मुख्यध्यापकाने पत्नीला संपवलं
नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीची गळा दाबून हत्या केली. पत्नीला मारल्यानंतर पतीने स्वतः गळफास घेतला. पत्नीची हत्या करुन स्वत: आत्महत्या करणाऱ्या पतीचं नाव मुरलीधर जोशी असं असून ते 78 वर्षांचे होते. तर मयत पत्नीचं नाव लता जोशी असं आहे. हे दोघेही निवृत्त शिक्षक होते. दोन्ही मुले मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. या अपार्टमेंटमध्ये मुरलीधर आणि लता हे दोघेच राहत होते. लता जोशी यांना 2017 पासून मेंदू विकाराचा त्रास होता. त्या एकदा व्हेंटिलेटरवरही होत्या. दीर्घ आजारपणाला हे दांपत्य कंटाळले होते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
चिठ्ठीत लिहिलेली ‘ती’ 2 वाक्यं
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुरलीधर जोशी यांनी, “पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत जात आहे,” असं लिहिलेलं आढळून आलं. “आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही”, असंही चिठ्ठीत लिहिल्याचं आढळून आलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.