
Panvel News : पैशांच्या हव्यासापोटी प्रत्येकजण आपआपल्या परिनं हातपाय मारतो. कोणी प्रचंड मेहनत करतो, तर कोणी सोप्या मार्गानं पैसे कसे मिळवता येतील यासाठीची कारस्थानं करतात. अशाच एका कारस्थानाची बातमी मुंबईपासून काहीच अंतरावर असणाऱ्या पनवेलमधून समोर आली आहे. जिथं गुप्तधनासाठी शेतात पूजा करण्यात आली असून, यामध्ये तीन इसमांनी एका व्यक्तीला तब्बल 40 लाखांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शेतात पुरलेलं धन बाहेर काढतो आणि… मांत्रिकानं आणखी काय आमिष दाखवलं?
पूजाविधीद्वारे शेतात पुरलेलं गुप्तधन बाहेर काढून तुमच्या कुटुंबाला होणारा त्रास कमी करून देतो, असं सांगत तीन तोतया मांत्रिकांनी एका व्यक्तीकडून तब्बल 397000 रुपये इतकी रक्कम असणारे दागिने आणि रोख रक्कम लुबाडली. ज्यानंतर त्यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयितांची नावं आणि हादरवणारा घटनाक्रम पाहिला?
तौसिफ मुजावर, मेहताब मुजावर, अझर मुजावर अशी संशयित आरोपींची नावं असून पोलीस यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत. सातत्यानं होणारं आर्थिक नुकसान आणि त्यामुळं गमावलेल्या मानसिक स्थैर्यामुळं पनवेलमध्ये एका व्यक्तीला त्याचाच मित्र
पनवेल रेल्वे स्टेशनसमोरील ज्योतिषाकडे घेऊन गेला.
तिथं ज्योतिषानं मांत्रिक तौसिफ मुजावर आणि इतर साथीदारांना बोलावले. या दोघांनी त्या व्यक्तीच्या घरात शेतजमिनीवरून अडचणी येत असल्याचं सांगत कुटुंबावर करणी करण्यात आल्याची भीती दाखवली आणि शेतजमीन दाखवण्यास सांगितलं.
तुमच्या शेतात गुप्तधन असून, तिथं पीर बाबाची शक्ती आहे असं आमिष दाखवत गुप्तधन बाहेर काढण्यासाठी पूजा केली तर कुटुंबाला होणारा त्रास कमी होईल, असा बनाव या भोंदू मांत्रिकाने रचला आणि शेतात जाऊन पूजा केली. पुढं एका फार्महाऊसवर सलग चार दिवस विधी केला आणि नजीकच्या करंजाडे इथं असणाऱ्या आणखी एका शेतावर खड्डा खोदण्यास सांगत तिथंही पूजेचा बनाव रचला.
मांत्रिकानं पूजा केली, गाठोडं दिलं आणि…?
पूजा झाली, त्यानंतर सोन्याचं तावीज आणि चैन तिथं देण्यात आली. आता कथित मांत्रिकानं शेवटचा फास आवळत शेवटचा विधी करावा लागेल, सांगून तौसिफनं सोनं आणि काही रकमेची मागणी केली. फिर्यादीनं हे ऐकून सर्वकाही सुरळीत होण्यच्या आशेनं गंठणासह रोख रक्कम दिली. ऐवज मिळताच मांत्रिकांनी त्यांना कपड्यात काहीतरी बांधून दिलं. विधी पूर्ण होताच आपल्या शरीरात शक्ती संचारून ती परवानगी देईल तोवर गाठोडं उघडू नका नाहीतर गुप्तधनाची व सोन्याची माती होईल, असं म्हणत मांत्रिकानं या व्यक्तीला आशेवर खिळवून ठेवलं.
महिनाभरानंतर जे घडलं ते पाहून या तक्रारदारावर आभाळ कोसळलं…
इथंच घात झाला. पूजाविधी झाल्या आणि त्यानंतर साधारण महिनाभर मांत्रिकाचा काहीच थांगपत्ता नाही. त्यामुळं तक्रारदाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी शेवटी बहिणीच्या घरी जात तिथं ते कपड्याचं बांधलेलं गाठोडं सोडलं आणि त्यांच्यावर आभाळच कोसळलं. कारण, त्याच गुप्तधन वगैरे नसून, माती होती. एका क्षणातच आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार या व्यक्तीकडून भामट्यांनी 34 तोळे सोनं आणि पाच लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.