
ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे किल्ले पन्हाळा येथे छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार शिवंशंभु प्रतिष्ठान आणि सरहद संस्थेने केला आहे. डॉ. पवार यांचे नुकतेच कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. डॉ. पवार यांनी पुण्यात गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज येथील रस्त्याला ‘महाराणी ताराराणी पथ’ असे नामकरण करण्याच्या समारंभात आणि त्यानंतरच्या भेटींमध्ये ही इच्छा बोलून दाखवली होती. महाराणी ताराराणींच्या ३५१ व्या जयंती वर्षात हे स्मारक व्हावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांनी यासाठी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी त्यांना याबाबत आश्वासनही दिले होते. औरंगजेबाने मराठा स्वराज्य नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले, तेव्हा महाराणी ताराराणींनी किल्ले पन्हाळ्याला आपली राजधानी बनवून मोगलांशी लढा दिला. १७०० ते १७०१ या काळात औरंगजेबाने पन्हाळ्याला वेढा दिला होता. महाराणी ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला नऊ वर्षे (१६९२-१७०१) झुंजवला. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि धैर्यामुळे पन्हाळा किल्ला मराठा सत्तेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला. किल्ले पन्हाळ्यावर आजही महाराणी ताराराणींचा वाडा, सुसज्ज तटबंदी आणि अनेक ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात. म्हणूनच पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे, असे डॉ. जयसिंगराव पवार यांचे स्वप्न होते. दुर्दैवाने, त्यांच्या हयातीत हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता त्यांच्या निधनानंतर, त्यांचे हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार पुण्यातील शिवंशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम आणि सरहद परिवाराचे मयुर मसूरकर यांनी केला आहे. या स्मारकात छत्रपती महाराणी ताराराणींचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी छत्रपती शाहू महाराज आणि या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. महेश कदम आणि मयुर मसूरकर यांनी शासनाला या स्मारक उभारणीस विलंब न लावता परवानगी देण्याचे आवाहन केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



