
Akola News: महाराष्ट्रभर नुकत्याच दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. अनेक विद्यार्थी अगदी मन लावून परीक्षेसाठी वर्षभर तयारी करत असतात. चांगले गुण मिळवण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करत असतात. दरम्यान अकोल्यातली मूर्तिजापूर शहरात एका विद्यार्थीनीच्या जिद्दीचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले आहे. परीक्षा केंद्रावर गेलेल्या एका विद्यार्थीनीला अचानक भोवळ आली मात्र, तरीही तिने तिचा गणिताचा पेपर दिला. तिच्या या जिद्दीची खरच दाद दिली पाहिजे, सर्व विद्यार्थांसाठी ती एक प्रेरणादायी उदाहण बनली आहे.
नेमकं काय घडलं?
गणिताचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेलेल्या एका विद्यार्थिनीला अचानक भोवळ आली. श्रेया देशमुख असे या विद्यार्थिनीचे नाव असून घटनेनंतर विद्यालय प्रशासनाने तत्काळ तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अचानक तब्येत बिघडल्याने श्रेयाचा गणिताचा पेपर अपूर्ण राहणार की काय, अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र पेपर राहिल्याची खंत तिच्याही मनात होती.
थेट रुग्णालयातून दिला पेपर
प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिने आपला गणिताचा पेपर पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. विद्यालय प्रशासनाने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व विशेष परवानगी मिळवली. डॉक्टरांनी तपासणी करून विद्यार्थिनीची प्रकृती समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय देखरेखीखाली श्रेयाने थेट रुग्णालयातूनच आपला गणिताचा पेपर पूर्ण केला. विद्यार्थिनीच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या चिकाटीने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
5000 हुन जास्त केंद्रांवर परिक्षा सुरू
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली असून ती 18 मार्च 2026 रोजी संपणार आहे. हे वेळापत्रक पुणे, नागपूर आणि मुंबईसह सर्व 9 विभागीय मंडळासाठी लागू केले गेले आहे. या परीक्षेसाठी राज्यभारातून 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांची नोंदणी केली गेली आहे. राज्यभरातील 5,111 केंद्रांवर या परीक्षा पार पाडल्या जात आहेत. या परीक्षेतील पहिला भाषाविषयक पेपर होता. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी बहुकौशल्य सहाय्यक तंत्रज्ञ, कृषी, यांत्रिक तंत्रज्ञान अशा विविध व्यावसायिक विषयांचे पेपर झाले. त्याशिवाय महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पेपर वेगवेगळ्या विषयाच्या सुरु आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीसह इतर माध्यमांचे विद्यार्थी परिक्षा देत आहेत.
अलीकडील 12 वीच्या परिक्षेतील दुर्घटना
महाराष्ट्रात अलीकडेच 10 वीच्या परिक्षा सुरु झाल्यात तर काही दिवसांपूर्वीच 12 वीच्या परिक्षाही सुरु झाल्या होत्या. दरम्यान 12 वीच्या विद्यार्थ्याचा ट्रेनमधील अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेच जास्त ताण न घेत योग्य काळजी घेऊन परिक्षा घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



