
Uddhav thackeray On Bjp Government: दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. या मोर्चात काँग्रेस, समाजवादी पक्ष, आप, द्रमुक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यासह इंडिया आघाडीतील जवळपास 300 खासदार सहभागी झाले होते. मतदार यादीतील अनियमितता आणि ‘मत चोरी’च्या आरोपांचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
कालचा दिवस देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा होता. आपणसगळे देशांत जे चालले आहे ते पाहत आहोत. भ्रष्टाचार एवढ्या उघडपणाने चालला आहे जसं काही महाराष्ट्रात बेबंदशाही आहे. कोणी कोणाला विचारायला बघतच नाही. मी कालदेखील म्हणालो होतो. आजदेखील म्हणतोय.उद्या देखील हेच म्हणेल. याचे कारण भ्रष्टाचारवाल्यांवर कारवाई होत नाही. काहीच कोणाला फरक पडत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. काल जे दिल्ली मध्ये घडले त्यात 300 खासदारांना अटक करण्यात आली. मतांची चोरी करून सत्तेत बसलेयत याचा जाब विचारायला जात होते त्यांना पकडले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जनतेने निवडून दिलेल्या खासदारांनीही प्रश्न नाही विचारायचे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एक एक करुन आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्या निघत आहेत. आता यांची सत्ता जायची वेळ आलेली असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मोर्चाचे कारण काय?
राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा दावा आहे की, 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणूक आयोगाने संगनमत करून मतांची चोरी केली. त्यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले आणि विरोधकांना डिजिटल मतदार यादी का दिली जात नाही?, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ पुरावे का नष्ट केले जातात?,खोटे मतदान आणि मतदार यादीतील गडबड का केली गेली?,विरोधी नेत्यांना धमकावले का जात आहे? निवडणूक आयोग भाजपचा एजंट बनला आहे का? असे 5 प्रश्न उपस्थित केले. या आरोपांमुळे देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधींनी यासाठी एक वेबसाइट लाँच करून जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
मोर्चादरम्यान नेमकं काय घडलं?
इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यात राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, संजय राऊत यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी झाले. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला औपचारिक परवानगी नसल्याचे कारण देत संसद परिसरातच बॅरिकेड्स लावून तो रोखला. पोलिसांनी सात स्तरांचे बॅरिकेडिंग केले होते, तरीही खासदारांनी ‘मतांची चोरी बंद करा’ अशा घोषणा देत निदर्शने केली. यादरम्यान, पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, संजय राऊत, सागरिका घोष यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले. काही खासदारांना खासगी बसमध्ये बसवून संसद पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, तर काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची पोलिसांशी झटापट झाली.
काय म्हणाले राहुल गांधी?
ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी बसमधून प्रसारमाध्यमांना सांगितले, “सत्य देशासमोर आहे. हा राजकीय संघर्ष नाही, तर संविधान आणि एक व्यक्ती-एक मत या तत्त्वासाठी लढा आहे. आम्हाला स्वच्छ मतदार यादी हवी आहे.” त्यांनी निवडणूक आयोगावर मतदारांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोपही केला.
निवडणूक आयोग आणि पोलिसांचे म्हणणे काय?
दिल्ली पोलिसांचे डीसीपी देवेश कुमार महाला यांनी सांगितले की, 30 खासदारांना निवडणूक आयोगाशी चर्चेसाठी परवानगी होती, परंतु मोर्चातील खासदारांची संख्या जास्त असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना औपचारिक तक्रार नसल्याने उत्तर देण्यास नकार दिला आहे. आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, मतदार यादीतील गोंधळाचे आरोप बिनबुडाचे असून, राहुल गांधींच्या दाव्यांमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचा अपमान होत आहे.
FAQ
1. निवडणूक आयोगावर मोर्चा का काढण्यात आला?
इंडिया आघाडीच्या खासदारांनी 11 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. याचे कारण राहुल गांधी यांनी केलेले आरोप होते की, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणूक आयोगाने संगनमत करून 2024 च्या निवडणुकांमध्ये मतांची चोरी केली आणि मतदार यादीत अनियमितता केल्या.
2. मोर्चात कोण-कोण सहभागी झाले?
मोर्चात काँग्रेस, समाजवादी पक्ष, आप, द्रमुक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यासह इंडिया आघाडीतील जवळपास 300 खासदार सहभागी झाले. राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते.
3. राहुल गांधींनी कोणते आरोप केले?
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर खालील गंभीर आरोप केले: विरोधकांना डिजिटल मतदार यादी दिली जात नाही. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ पुरावे नष्ट केले जातात. खोटे मतदान आणि मतदार यादीत गडबड केली गेली. विरोधी नेत्यांना धमकावले जाते. निवडणूक आयोग भाजपचा एजंट बनलाय, असे आरोप केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.