
Ajit Pawar Congratulates Zee 24 Taas: पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाची आपल्याला कल्पना नव्हती असा दावा करत अजित पवारांनी यु-टर्न घेतला आहे. तसंच आपण आज संध्याकाळी या प्रकरणावर सविस्तर बोलणार असल्याची माहिती दिली आहे. तसंच आपलं पार्थ पवार किंवा इतर कोणाशीही बोलणं झालेलं नाही असंही म्हटलं आहे.
“माझा या गोष्टीशी दुरान्वये संबंध नाही हे मी कालच मराठीत सांगितलं आहे. आज सकाळापासून आमच्या आढावा बैठका आहेत ज्या 6 ते 7 वाजेपर्यंत सुरु असतील. त्यानंतर मी सांगणार आहे. इतर सर्व गोष्टी नियमाप्रमाणे करण्यास सांगितल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. चौकशी होत असून त्यातून सत्य बाहेर येईल. सत्य समोर आल्यानंतर कारवाईसंदर्भात निर्णय घेतला जाईल,” असं अजित पवारांनी झी 24 तासशी संवाद साधताना सांगितलं.
तुम्हाला याची कल्पना होती का? असं विचारलं असता अजित पवारांनी नकार दिला. “नाही, अजिबात नाही. मी नेहमी माझ्या लोकांना कोणतीही गोष्ट करताना कायद्याच्या, नियमाच्या, संविधानाच्या चौकटीत राहूनच करावी असं सांगतो”. तुम्ही हे प्रकरण काढलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान पार्थ पवारांशी खासगीत कोणतंही बोलणं झालं नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने त्यात मी व्यापलो आहे असं कारण त्यांनी दिलं.
अजित पवार काल काय म्हणाले होते?
“तीन ते चार महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचं माझ्या कानावर आलं होतं. तेव्हा मी असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असं सांगितलं होतं. कोणत्याही चुकीच्या गोष्टी कोणीही करु नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिल्या होत्या. त्यानंतर परत काय झालं मला माहिती नाही. आता वेगवेगळ्या जमिनीबद्दल बरंच काही सांगितलं जातं. त्याची इत्यंभूत माहिती घेणार आहे की कोणती कागदपत्रं आहेत कोणती नाही, कोणी परवानगी दिली, कोणी नाही,” असं अजित पवारांनी सांगितलं होतं.
पुढे ते म्हणाले की, “मी आजपर्यंत मी जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांसंदर्भात फायदा होण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही किंवा सांगितलेलं नाही. उलट मी यानिमित्ताने अधिकारी, कर्मचाऱ्यांना जर माझ्या नावाचा वापर करुन कोणी चुकीचं करत असेल किंवा नियमात न बसणारं करत असेल तर माझा पाठिंबा नसेल असं सांगत आहे. मी कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत राहून काम कऱणारा कार्यकर्ता आहे”.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



