
मुंढवा भूखंड व्यवहार 2021 पासूनच पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या नियंत्रणात होता. पण हे प्रकरण अंगाशी आल्यानंतर त्याची जबाबदारी माझ्यासारख्या मध्यस्थावर ढकलण्यात आली, असा दावा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शीतल तेजवानीने केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. तेजवानीच्या या दाव्यामुळे दिवंगत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर मुंढवा येथील 1800 कोटींची महार वतनाची जमीन अवघ्या 300 कोटींत खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपांची राळ उठल्यानंतर हा सौदा रद्दबातल करण्यात आला. नंतर या प्रकरणी शीतल तेजवानी यांच्यासह अन्य एका कथित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर विजय कुंभार यांनी शीतल तेजवानीचा दाखला देत या प्रकरणाचा सर्व व्यवहार 2021 पासूनच पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली होता असा दावा केला आहे. प्रकरण अंगाशी आल्यानंतर माझ्यावर जबाबदारी लोटली – शीतल तेजवानी विजय कुंभार शुक्रवारी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले, स्फोटक: शीतल तेजवानीचा आरोप, माझ्याविरूद्धचे प्रकरण म्हणजे अंगाशी आल्यानंतर आखलेला सुटकेचा डाव आहे. ती म्हणते, 2021 पासून हा व्यवहार अमेडीयाच्या नियंत्रणात होता. 2021 ची पॉवर ऑफ अटर्नी (PoA) सर्व पक्षांना पूर्ण माहिती असताना करण्यात आली. प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे जाणीवपूर्वक दडवण्यात आली आहेत. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर दस्त रद्दही दावा दाखल करण्यात आला. व्यवहार धोकादायक ठरल्यानंतर जबाबदारी माझ्यासारख्या मध्यस्तावर वर ढकलण्याचा प्रयत्न होतोय. 2021 च्या PoA पासूनच पार्थ पवार यांना वस्तुस्थिती माहिती होती. आता तेजवानी हीने BNSS कलम 379 चा आधार घेत फिर्यादीवर न्यायालयाची दिशाभूल आणि न्यायप्रक्रियेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. अमेडियाने दावा केला आहे की, मालकी हक्काबाबत त्यांची फसवणूक झाली असून जमीन हस्तांतरितच होऊ शकत नव्हती. तसेच री-ग्रँट नाकारल्याची माहिती लपवण्यात आली. तरीही 2025 मध्ये “स्वच्छ टायटलची खात्री” मिळाल्यानंतर खरेदी नोंदणी करण्यात आली. जमीन हस्तांतरित होऊ शकत नव्हती, मग व्यवहार का केला? टायटल संशयास्पद होते, मग नोंदणी का केली? कंपनी व्यवहार चालवत होती, मग मध्यस्थावर आरोप का? हा आता केवळ मालमत्तेचा वाद राहिलेला नाही. हा व्यवहार कोणी आखला आणि तो फिसकटलानंतर इतिहास कोण बदलत आहे? असे विविध प्रश्न विजय कुंभार यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत. कोण आहे शीतल तेजवानी? शीतल तेजवानी ही पिंपरीची रहिवासी आहे. शीतल व तिचा पती सागर तेजवानी यांच्याविरोधात यापूर्वीही फसवणुकीचे काही गुन्हे दाखल आहेत. या दाम्पत्याने विविध 10 कर्जे घेतली होती. या कर्ज प्रकरणात त्यांनी बनावट कागदपत्र जोडली होती. हे कर्ज त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड येथील सेवा विकास बँकेच्या शाखेतून घेतले होते. ते कर्ज त्यांनी ज्या कारणांसाठी घेतले होते, त्याचा त्यासाठी वापर केला नाही. त्यांचा हा घोटाळा 2019 मध्ये उजेडात आला. त्यानंतर पोलिसांनी 2023 मध्ये त्यांचे घर व कार्यालयावर छापा टाकला होता. या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



