
हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : (Language Controversy) भाषावादानं सध्या राजकीय वातावरण तापलेलं असतानाच या वादात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ज्यामुळं आता गुजराती आणि मराठी भाषेचा वाद पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील घोडबंदर ते अच्छाड पर्यंतच्या बहुतांश हॉटेलांच्या पाट्या गुजराती भाषेत असल्यामुळे महामार्गावरून पालघर जिल्ह्यात प्रवेश करताना गुजरातमध्ये आल्याचा भास होत आहे. महामार्गालगतच्या मीरा रोड मध्ये हिंदीच्या सक्ती विरोधात आंदोलने होत असतानाच महामार्गाच्या गुजरातीकरणाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केले जात आहे.
गुजराती पाट्यांविरोधात पालघर जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालयाकडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र इथे स्पष्ट होत आहे. रात्री या मार्गावरून प्रवास करताना उजेडात या पाट्या त्यावर केलेल्या रोषणाई यांमुळे अधिक प्रकाशमान होऊन ये-जा करणाऱ्यांचं लक्ष वेधत पालघर महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? हाच प्रश्न उपस्थित करुन जात आहे.
हेसुद्धा वाचा : आता काय ती देवाक् काळजी; गणपती विशेष ट्रेन सेकंदात फुल्ल! चाकरमान्यांना गाव गाठायचं कसं हीच चिंता…
अधिकारी याकडे का लक्ष देत नाहीत?
मुंबई अहमदाबाद महामार्गावर असणाऱ्या या गुजराती पाट्यांसंदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनीसुद्धा झी 24तासशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. एकिकडे मराठी पाट्यांची सक्ती होत असतानाच या दुकानांकडे होणाऱ्या दुर्लक्षाविषयी प्रश्न विचारला असता, ‘मी खात्रीनं सांगतो, राज ठाकरेंच्या भाषणामध्ये हे आलं होतं की पालघर ते मुंबई या परिसरामध्ये गुजरातमध्ये येणाऱ्या गाड्या, व्यापारी, दुकानदार यांनी सर्रास जागा खरेदी केल्या आहेत. जवळजवळ ते गुजरातमध्येच आहेत असं भासवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून मागील कैक वर्षांपासून होत आहे. आपल्याकडे कायदे आहेत, पाट्यांसाठीचे कायदे आहेत, दंड आहे मात्र अधिकारी याकडे का लक्ष देत नाहीत?’ असा उद्विग्न प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हे सगळं पेरलं जात असल्याचं राज ठाकरेंचं वक्तव्य इथं अधोरेखित करत भविष्यात महाराष्ट्राला याचा फार मोठा त्रास होणार असून, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा एक भाग असल्याचा मुद्दा त्यांनी उजेडात आणला. दरम्यान, इथं बऱ्याच दुकानांच्या पाट्या मराठीत केल्या असून, उर्वरित पाट्या पुढील आठ दिवसांमध्ये उतरवून त्या मराठीत केल्या जातील अशी हमी जाधव यांनी दिली. या कृत्यांना भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचं म्हणत तिथं असणारे आमदार, खासदार भाजपचे असल्यानं त्यांच्या माध्यमातूनच हे होत आहे आणि महाराष्ट्रातील नेत्यांमुळं यांचं महाराष्ट्रात फावतंय असं जाधव संतापाचा सूर आळवत म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.