
Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी मान्सून (Monsoon) अंदाज वर्तवल्याच्या आधीच हजेरी लावताना दिसला. साधारण मे महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून बरसणारा हा पाऊस थेट दसरा आणि आता दिवाळीपर्यंतही मुक्कामी असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर आता नव्यानं वर्तवण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्र आणि इतरही काही राज्यांतून पाऊस वर्षअखेरीसही परतणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
परतीच्या पावसाचे वेध म्हणजे फक्त चकवा?
मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये यंदा अपेक्षेहून अधिक काळासाठी मुक्कामी असणाऱ्या पावसानं तीनतेरा वाजवलेले असतानाच आता या चिंतेत आणखी भर टाकणारं वृत्त समोर आलं आहे. केंद्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षीचा नाताळसुद्धा पावसातच जाणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
आयएमडीच्या दीर्घकालीन अंदाजानुसार पुढील तीन महिने अर्थात (ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर) महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम असेल. किंबहुना या काळात सरासरीहून अधिक पाऊस बरसण्याची आणि परतीच्या पावसाचा प्रवास लांबण्याची शक्यता असल्यानं यंत्रणांसाठीसुद्धा हा महत्त्वाचा इशारा आहे. यंदा उन्हाळ्याच्या झळा कमी लागल्यानंतर आता पावसाचा वाढलेला मुक्काम पाहता हिवाळासुद्धा नाहीसा झाला आहे का? हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पावसाचा मुक्काम वाढण्यामागे काय कारण?
ये रे ये रे पावसा, म्हणणारी मंडळी आता पावसाचा मुक्काम वाढल्यानं जा रे जा रे म्हणताना दिसत आहेत आणि या परिस्थितीला एक हवामान प्रणाली कारणीभूत ठरत आहे. मान्सूनोत्तर पर्जन्यास पॅसिफिक महासागरात सक्रिय असणारी ‘ला निना’ प्रणाली कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यानच्या काळात ‘ला निना’ स्थिती विकसित होण्याची शक्यता 71 टक्के इतकी असून, सहसा ही प्रक्रिया भारतीय मान्सूनसाठी पोषक असून, त्याचा प्रभाव मान्सूनच्या निर्धारित काळानंतरही दिसतो. ज्याची प्रचिती यंदाच्या वर्षी पाहायला मिळत आहे.
FAQ
यंदा मान्सून कधी सुरू झाला आणि तो किती काळ राहिला?
यंदा मान्सून मे महिन्याच्या अखेरीस (सुमारे 24 मे 2025) सुरू झाला, जो सामान्यतः 1 जून असतो. तो जून ते सप्टेंबरपर्यंत चालला आणि 7.9% अधिक पावसाची नोंद झाली, ज्यामुळे तो दसरा आणि दिवाळीपर्यंत मुक्कामी राहिला.
IMD च्या दीर्घकालीन अंदाजानुसार ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात पाऊस कसा असेल?
IMD च्या अंदाजानुसार, ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक (>115% LPA) पाऊस अपेक्षित आहे.
पावसाचा मुक्काम वाढण्याचे मुख्य कारण काय?
पावसाचा मुक्काम वाढण्यामागे पॅसिफिक महासागरातील ‘ला निना’ प्रणाली कारणीभूत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान ला निना विकसित होण्याची शक्यता 71% आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.