
मुंबई15 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे चित्रपटसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येईल, असे भाकीत केले आहे. पुढच्या दीड वर्षांत सिनेमा पूर्णपणे बंद होईल, कारण AI जे व्हिज्युअल्स तयार करतं, ते कॅमेऱ्याद्वारे निर्माण करणे अशक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा सगळ्यांनी नाटकांकडे वळले पाहिजे, असेही ते म्हणाले.
सध्या बऱ्याच क्षेत्रात एआयचा वापर वाढला आहे. केवळ एका प्रॉम्प्टवर अवघड काम सोपे होते. अनेक क्षेत्रांत एआयमुळे अनेकांचे रोजगार जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अशातच आता चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी एआयच्या संदर्भाने चित्रपटसृष्टीविषयी भयावह भाकित केले आहे. ते एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
नेमके काय म्हणाले महेश मांजरेकर?
महेश मांजरेकर म्हणाले, “AI ने एवढं टेकओव्हर केलंय की आता मानवी सर्जनशीलतेची गरजच उरणार नाही. माझं मत आहे, दीड वर्षानंतर सिनेमा बंद होईल — बंद म्हणजे बंदच! तुम्ही कितीही चांगले VFX केले, तरी AI तयार करत असलेली दृश्यं कॅमेऱ्यावर देणं अशक्य आहे. मी घरबसल्या बसून ‘टायटॅनिक’मधली लायटिंग, लिओनार्डो डिकॅप्रियोपेक्षा चारपट सुंदर हिरो तयार करून सिनेमा बनवू शकतो. म्हणजे, आता घरी बसूनच चित्रपट निर्मिती शक्य झाली आहे.”
‘महाभारत’ ट्रेलरचा दिला दाखला
महेश मांजरेकरांनी एआयने तयार केलेल्या ‘महाभारत’च्या ट्रेलरचाही उल्लेख केला. “तो ट्रेलर अक्षरशः डोळे दिपवणारा आहे. जर हे सर्व एका क्लिकवर होऊ शकत असेल, तर लोक कलाकारांवर पैसे का खर्च करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र, AI वापरण्यासाठीही हुशारीची गरज लागेल, असेही त्यांनी नमूद केले. पण मी सहा महिन्यांपूर्वी पाहिलेला AI आणि आजचा AI यात जमीन-अस्मानाचा फरक आहे,” असे ते म्हणाले.
येत्या दीड वर्षात सिनेमा बंद होणार
ते पुढे म्हणाले, ज्या दिवशी AI ला सिनेमा बनवण्याचा कोड मिळेल, त्या दिवशी आपण संपणार! कारण रोज दहा हजार सिनेमे तयार होतील आणि त्यासाठी जवळपास काहीच खर्च लागणार नाही. माझ्या एका मित्राने एआयच्या मदतीने अॅड फिल्म केली आणि त्याला खर्च आला फक्त दोन हजार रुपये.
लोक एआयच्या मदतीने मोठ्या प्रमाणात सिनेमे तयार करतील, पण ते बघणार कोण? त्यामुळे येत्या दीड वर्षांत सिनेमे बंद होणार, हे मला नक्की दिसतंय. म्हणून आता सगळ्यांनी गुपचूप नाटकांकडे वळले पाहिजे. कारण येत्या दीड वर्षांत सिनेमा संपणार हे माझे भाकीत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited



