
Maharashtra Weather News : देशाच्या पर्वतीय भागांमधील हवामानामध्ये झालेल्या बदलांसह दक्षिण भारताकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळंही महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होतना दिसत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार उत्तर पश्चिम भारतामध्ये उष्णतेच्या लाटेसम परिस्थिती असेल, तर पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल, तर काही राज्यांमध्ये वादळी वारेसुद्धा वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
महाराष्ट्रात होरपळीपासून दिलासा
गेले काही दिवस महाराष्ट्रात पारा चांगलाच वाढला असून, राज्याच्या ब्रह्मपुरी भागामध्ये 44 ते 45 अंश इतक्या तापमानाची नोंद सातत्यानं करण्यात आली. पुणे, मुंबईसह विदर्भातही चित्र वेगळं नाही. तर, तिथं कोकणात दमट हवामानामुळं उष्मा अधिक जाणवत होता. या सर्व परिस्थितीमध्ये पुढील 48 तासांमध्ये हवामानात मोठे बदल होणार असून, पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे.
पुढचे तीन दिवस राज्यातल्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पुढचे 5 दिवस विजांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातही मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. काही जिल्ह्यात गारपीटीचा अंदाजवही वर्तवण्यात आलाय.
राज्याच्या लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर या भागांना अवकाळीचा तडाखा अपेक्षित असून, इथं गारपिटीचाही इशारा जारी करण्यात आला आहे. तर, अकोला भागात उष्णतेची लाट मात्र कायम असेल. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगलीपासून सिंधुदुर्गापर्यंत दिवस मावळतीला जात असताना अभाळात पावसाळी ढगांची दाटी पाहायला मिळेल. तर, काही भागांमध्ये वादळी पाऊस हजेरी लावून जाईल.
महाराष्ट्रात उत्तरेपासून ते अगदी पश्चिमेपर्यंत विविध जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून, यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, गडचिरोली या भागांचा समावेश आहे. हवामानाचा एकंदर इशारा पाहता शेतकरी आणि बागायतदारांसह नागरिकांनाही सतर्क राहणं फायद्याचं ठरेल.
उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी आणि रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय श्रीनगर, शिमला आणि देहरादून या मुख्य शहरांमध्ये तापमानाचा कमाल आकडा 20 ते 25 अंश सेल्सिअस आणि किमान तापमाना 10 ते 7 अंशांपर्यंत खाली उतरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.