
Pune Merto Update: पुणेकरांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पुणेकरांचा प्रवास आता सोप्पा होणार असून मंत्रिमंडळ बैठकीत पुणे-लोणावळासंदर्भात आणि पुणे मेट्रोबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. तसंच, स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेवर दोन नवी स्थानके उभारण्यासही राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी हे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी मुंबईसह राज्यातील अन्य पाच मोठ्या शहरांबाबतही निर्णय घेण्यात आले आहेत.
पुणेकरांचा प्रवास सोप्पा होण्यासाठी फडणवीसांनी दोन मोठे निर्णय घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष असलेल्या पुणे-लोणावळा उपनगरी रेल्वे मार्गावर आता तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या उभारणीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळं पुणे-लोणावळा कॉरिडॉर अधिक सक्षम होणार आहे. या परिसरातील औद्योगिक, निवासी व व्यावसायिक विकासाला पाठूबळ मिळणार आहे. राज्य सरकार व रेल्वे मंत्रालय प्रत्येकी 50 टक्के खर्च उचलणार असून या निर्णयामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन परिसरातील कनेक्टिव्हिटी सुधारेल.
दरम्यान, 2017मध्ये या मार्गिकेचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र जमीन अधिग्रहण व अन्य कारणामुळं तिसरा आणि चौथा मार्ग रखडला होता. मात्र आता राज्य सरकारने याबाबत पुढाकार घेत पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे.
दोन नवीन स्थानके
स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेवर दोन नवी स्थानके उभारण्यासही राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे मेट्रोच्या एकमधील बालाजीनगर-बिबवेवाडी व स्वारगेट-कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली आहे. रेल्वे व मेट्रो प्रकल्पांना मिळालेल्या मान्यतेमुळे कामे गतीने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
1) स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावर कोणती नवीन स्थानके उभारली जाणार आहेत?
स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेवर बालाजीनगर-बिबवेवाडी आणि स्वारगेट-कात्रज ही दोन नवीन स्थानके उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
2) नवीन मेट्रो स्थानकांचा पुणेकरांना काय फायदा होईल?
या स्थानकांमुळे स्वारगेट, बिबवेवाडी, कात्रज, गुलटेकडी, साईबाबा नगर आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना मेट्रो प्रवासाची सोय होईल. शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढेल. स्थानिकांना जलद, सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.
3) पुणे मेट्रोच्या या विस्ताराचे काम कधी पूर्ण होईल?
सध्या उपलब्ध माहितीनुसार, पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे काम मार्च 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. स्वारगेट-कात्रज मार्गिकेच्या कामाला गती मिळाल्याने लवकरच स्थानके कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.