
पुण्यात एका सुशिक्षित कुटुंबाला अंधश्रद्धेच्या नावाखाली लुबाडण्यात आल्याची धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. दांपत्य उच्चशिक्षित असतानाही भोंदूबाबाच्या नादाल लागून त्यांनी तब्बल 14 कोटी गमावले आहेत. कौटुंबिक अडचणी दूर होतील या भूलथापाला बळी पडून त्यांनी आपली आयुष्यभराची कमाई गमावली आहे. पैसे जमा करण्यासाठी त्यांनी परदेशातील घर, शेतीही विकली. तसंच सोन्यावर कर्ज काढलं. अखेरीस आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहिलं असून तक्रार केली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिलेल्या तक्रारी अर्जानुसार, पीडित कुटुंबीय हे पती- पत्नी असून एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहेत. त्यांना असलेल्या दोन्ही मुलींना व्याधी असल्यामुळे त्या आजारी असतात. त्यातील एका मुलीला अलुपेशीया नावाचा आजार असल्याने तिला कमी प्रमाणात केस येतात.
या दांपत्याला भजनाची आवड असल्याने ते अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी जात असे. यावेळी त्या दोघांची दिपक जनार्दन खडके या व्यक्तीशी ओळख झाली. या दांपत्याच्या मुलींबाबत खडके यांना कळल्यानंतर त्याने त्यांची ओळख वेदिका कुणाल पंढरपूरकर व कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली. यावेळी त्यांनी “वेदिका शंकरबाबाची लेक असून तिच्या अंगात शंकरबाबा येतात. ते तुमची सर्व कामे करून देतील. तुमच्या मुलींचे आजार ठीक करतील तुम्ही निश्चिंत रहा” असं सांगितलं.
यानंतर खडके यांच्या एका दरबारात, या दांपत्याला जेव्हा वेदिका भेटली तेव्हा तिने अंगात शंकरबाबा आल्याचं सांगितलं. तसंच शंकर महाराजांचा अभिनय करून स्वतः शंकर बाबा बोलत असल्याबाबत भासवलं. यावेळी या दाम्पत्याकडे असलेली सर्व रक्कम माझ्याकडे द्या आणि मुलीचा आजार गंभीर असून दोष जास्त आहेत, त्यामुळे आजार बरा होण्यास कालावधी लागेल असं सांगून करोडो रुपये उकळले.
यावरच न थांबता वेदिका नामक महिलेने पुन्हा एकदा शंकर महाराज यांचा अभिनय करून घर विका, शेती विका आणि पैसे जमा करा असं सांगून फसवणूक केली. मुली बऱ्या होतील या खोट्या आशेने या दांपत्याने परदेशातील घर सुद्धा विकलं आणि त्याचे पैसे या महिलेला दिले.
पुढे या देविका नावाच्या महिलेने त्या दांपत्याला सुपारी, नारळ व दगड अशा वस्तू घरात ठेवण्यास सांगितल्या. शेवटचा पर्याय असल्याचे सांगून त्यांनी दांपत्याला राहते घर देखील विकण्यास भाग पडले. आपल्या मुली बऱ्या होत नसून गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला हा सर्व प्रकार फसवणूक असल्याचं लक्षात आल्यानंतर दांपत्याने पोलिसांकडे धाव घेतली आहे.
दाम्पत्याने याप्ररकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आम्हाला खोटी माहिती देऊन. अंगात शंकर बाबा येतात असं भासवून विश्वास केला. खोट्या भूलथापा देऊन, आश्वासन देऊन आमच्या मिळकती विकण्यास सांगून सदरची रक्कम त्यांचे खात्यामध्ये जमा करण्यास सांगून आमची 13 ते 14 कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



