
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकासंदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला असून याचा पुणेकरांना फटका बसणार आहे. अर्थात या नव्या नियमाचं उल्लंघन केल्यास पुणेकरांना खिसाही हलका करावा लागेल अशी दाट शक्यता आहे. लोहमार्ग पोलिसांनी वाहतूक विभागाशी चर्चा केल्यानंतर पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये नवा नियम लागू केला आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसर हा नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळेच आता पुणे रेल्वे स्थानक आवारातील अधिकृत वाहनतळ वगळता दोनशे मीटरच्या परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे स्थानकाच्या आवारातील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र त्याचवेळेस नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयही सहन करावी लागणार असल्याची चर्चा आहे.
रेल्वे पोलीस आणि वाहतूक पोलिसांची चर्चा
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील दोन्ही प्रवेशद्वारांवर (इन आणि आउट गेट) बेशिस्तपणे वाहने लावल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत होत होती. प्रवेशद्वाराच्या परिसरात वाहने लावल्याने कोंडी होत असल्याच्या दिसून आलं होतं. रेल्वे स्थानकाच्या आवारातील कोंडीच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्याशी उपाययोजनांबाबत चर्चा केली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या परिसरातील दोन्ही प्रवेशद्वारांपासून 200 मीटर अंतरावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे
> पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आलं आहे.
> या घोषणेमुळे पुणे रेल्वे स्थानकातील अधिकृत पार्किंग वगळता 200 मीटर भाग नो पार्किंग झोन झाला आहे.
> रेल्वे विभागाकडून फलक लावून या नो पार्किंग झोनबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.
> जनजागृतीनंतर जर कोण कायद्याचा नियम मोडून पार्किंग करत असेल तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
> पुणे रेल्वे स्थानकाच्या आत जाणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या दोन्ही प्रवेशद्वारावर गेल्या काही दिवसापासून बेकायदा पार्किंग करण्याची संख्या वाढल्याने प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.
> नो पार्किंग झोनमध्ये टॅक्सी, रिक्षा, पीक अँड ड्रॉपची सुविधा देण्यात आली आहे.
> त्याचबरोबर फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांना या नियमातून वगळण्यात आलं आहे.
> म्हणूनच आता पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये कार अथवा दुचाकी पार्क केल्यास मोठा आर्थिक दंड भरावा लागू शकतो. एकीकडे वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असली तरी नो पार्किंग झोनचा नियम न पाळल्यास आर्थिक फटकाही बसणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.