
BJ Medical College Ragging Case: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मागील काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात सापडेललं असतानाच आता ससून रुग्णालयासंदर्भातही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये दोन निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंत्रालय स्तरावरुन चक्रे फिरल्यानंतर खडबडून जागे झालेल्या कॉलेज प्रशासनाने मंगळवारी अँटी रॅगिंग समितीची बैठक आयोजित केलेली.
बैठकीत तक्रारदार आणि आरोपींकडून माहिती घेतली
मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये तक्रारदार विद्यार्थ्यांकडून आणि ज्याच्या विरोधात तक्रार आहे या विद्यार्थ्यांकडून माहिती घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण
ऑर्थोपेडिक्स विभागातील पहिल्या वर्षाला शिकत असणाऱ्या निवासी डॉक्टरने वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. अनेक दिवस या विद्यार्थ्याला वरिष्ठ डॉक्टरांकडून त्रास दिला जात होता. मात्र, त्याच्या तक्रारीची योग्य दखल कॉलेज पातळीवर घेतली गेली नाही. त्यामुळे संबंधित तक्रारदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी याची तक्रार थेट मंत्रालय स्तरावर केली. त्यानंतर चक्रे वेगाने फिरली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती, अशी माहिती समोर येत आहे.
समिती स्थापन केली
बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालय येथील अस्थिव्यंगोपचार विभागातील एका कनिष्ठ निवासी डॉक्टरने (ज्युनियर रेसिडेंट) त्याच विभागातील तीन वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी (सिनियर रेसिडेंट) रॅगिंग केली असल्याची तक्रार वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडे केली आहे. ही तक्रार सोमवारी केल्यावर मंगळवारी याबाबत चौकशी समितीकडून प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ससूनकडून एका समितीची स्थापना केली होती. या समितीने तक्रार करणारा निवासी डॉक्टर आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे असे तीन निवासी वरिष्ठ डॉक्टरांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निवासस्थानी राहू नये असा आदेश दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
मंगळवारी रात्री उशीरापर्यंत बैठक
समितीकडून ही चौकशी मंगळवारी करण्यात येत होती. तर, ससूनचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक मंगळवारी हे रात्री उशिरापर्यंत याबाबत ससून रुग्णालयात बैठकीच्या सत्रात होते. दरम्यान हा प्रकार अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के यांच्या युनिटमधील डॉक्टरांमध्ये घडला असल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली.
या प्रकरणावर डीन काय म्हणाले?
बी. जे. मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग तक्रार प्रकरणी ससून रूग्णालयाने कोणताही विलंब केला नसल्याचा दावा डीन डॉ. एकनाथ पवार यांनी केला आहे. “आम्हाला यासंबंधी सोमवारी लेखी तक्रार दाखल होताच आम्ही तीन प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरांवर कारवाई केली असून त्यांना बी. जे. मेडिकल वसतीगृहातून देखील निलंबित केलं आहे, असा खुलासा ससूनचे डीन पवार यांनी केला आहे. या रँगिग प्रकरणाचा अंतिम लवकरच सादर केला जाईल असंही डीन पवार यांनी ‘झी 24 तास’शी बोलताना म्हटलं आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजमधे रँगिगचा प्रकार दडपण्याचा आरोप एका वृत्ताद्वारे झाल्यानंतर डीन पवार यांनी हा खुलासा केला आहे.
2006 मध्येही झाले होते रॅगिंग
बी. जे. मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या मुलांवर 27 ऑगस्ट 2006 रोजी रात्री 10 वाजता वरिष्ठ विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळ खेळण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. 2024 मध्येही पहिल्या वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांना टार्गेट करून रॅगिंग करण्यात आले होते.
2019 मध्ये रॅगिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या
2019 मध्ये मुंबईमध्येही रॅगिंगसंदजर्भात एक भयानक घटना घडली होती. 2019 मध्ये रॅगिंगला कंटाळून नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर पायल तडवी हिने हॉस्टेलच्या रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.