
Saamana Editorial on Devendra Fadnavis: मुळात फडणवीस यांचे सरकार व कार्यपद्धती म्हणजेच एक महाघोटाळा आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील घोटाळ्यांचे नवे पुरावे समोर आले आहेत. पुरुषांनी ‘बहिणीं’चे पैसे लाटले. तो लुटीचा आकडा पंचवीस कोटींच्या घरात आहे. मिंधे, फडणवीस वगैरेंच्या संगनमताने झालेला हा घोटाळा आहे व हे लोक विरोधकांचा घोटाळा उघड करू अशा धमक्या देत आहेत. आपण केलेल्या घोटाळ्याचे खापर विरोधकांवर फोडणे हा लोकद्रोह आहे लोकद्रोहालाही मर्यादा असते आणि त्याची सजा मिळाल्याशिवाय राहत नाही राहता कामा नये अशा शब्दांत ठाकरेंच्या शिवसेनेने सामना संपादकीयमधून ताशेरे ओढले आहेत. सरकार फडणवीसांचे आणि घोटाळे विरोधक करत आहेत. मग मुख्यमंत्री काय करत आहेतय. राजीनामा द्या व संघ कार्यालयात जाऊन बसा इतकेच आम्ही सांगू शकतो असंही सुनावलं आहे.
“विरोधकांचे घोटाळे बाहेर काढू, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. हा घोटाळा मतदार याद्यांसंदर्भात आहे. मतदार यादीतील घोटाळ्यांमुळे विरोधी पक्षांच्या लोकांना कसा लाभ झाला ते उघड करू, अशी आदळआपट मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऐन दिवाळीत करावी हे बरे नाही. याचा अर्थ असा की, विरोधकांनी राज्यात निवडणूक आयोगाविरुद्ध उघडलेली मोहीम व त्यातून बाहेर निघालेले घोटाळ्यांचे बॉम्ब फडणवीसांच्या मर्मस्थानावर पडले आहेत,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
“फडणवीस यांनी घोटाळ्यांवर बोलावे हा विनोद आहे. भाजप व त्यांच्या लोकांचा निवडणुकीतला भ्रष्टाचार वारंवार चव्हाट्यावर आला. निवडणूक आयोग त्यांच्या टाचेखाली आहे. जिल्हा पातळीवरील निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचेच. मतदार यादीत नावे घुसवणे व काढणे हे करणारी सर्व यंत्रणा फडणवीस पंपनीच्या हातात. निवडणूक आयोग सरकार दरबारी पाणक्याचे काम करत असताना ‘विरोधकांना निवडणूक घोटाळ्याचा लाभ झाला’ असे विधान करणे यास काय म्हणावे?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.
“दोन दिवसांपूर्वी काँगेसचेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, त्यांच्या संगमनेर मतदारसंघात साधारण साडेनऊ हजार मतदार बोगस आहेत. अधिकाऱ्यांनी पडताळणी न करता ही नावे मतदार यादीत समाविष्ट करायची घाई केली. कारण थोरातांचा पराभव सरकारला घडवायचा होता. यातील असंख्य मतदारांचा पत्ता मतदारसंघाबाहेरचा आहे. हे पाहिले तर यादीतील घोटाळ्याचा लाभ विरोधकांना झाला, हा दावा म्हणजे बकवास आहे,” अशी टीका करण्यात आली आहे.
“संगमनेरमध्ये साडेनऊ हजार मतदार बोगस निघाले निघाले व तेवढ्याच मतांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना मूर्ख समजू नये. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सूर्याबरोबर काम केलेली विरोधकांची पिढी महाराष्ट्राच्या राजकारणात आजही आहे. आज त्यांना फडणवीस वगैरे लोकांकडून हे अकलेचे धडे घ्यावे लागत आहेत. घोटाळ्यांवर श्री. फडणवीस अलीकडे जास्तच बोलू लागले आहेत. इंदिरा गांधींच्या काळात त्यांनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला. तो विकासाचा योजनाबद्ध कार्यक्रम होता. त्यावर दादा कोंडके यांनी ‘गंगाराम वीस कलमे’ असा विनोदी चित्रपट निर्माण केला. त्याचप्रमाणे ‘फडणवीस वीस कलमे’ असा एखादा चित्रपट राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने काढायला हरकत नाही,” असा टोला लगावण्यात आला आहे.
पुढे म्हटलं आहे की, “विरोधी पक्षांच्या घोटाळ्यावर फडणवीस गेल्या वीस तासांत वीस वेळा बोलले. खरे तर असा घोटाळा झाला व विरोधकांनाही त्याचा लाभ झाला, असे फडणवीसांनी म्हणणे म्हणजे निवडणूक यंत्रणेत व मतदार याद्यांत मोठा घोटाळा सुरू असल्याची कबुलीच ‘फडणवीस वीस कलमे’ देत आहेत. फडणवीस यांनी दिवाळीनिमित्त ‘वर्षा’ बंगल्याच्या हिरवळीवर पत्रकारांना ‘खाना’ दिला. आपले सरकार करीत असलेल्या घोटाळ्यांना मोठी प्रसिद्धी मिळू नये, प्रकरणे जागच्या जागीच दाबली जावीत यासाठी फडणवीस सरकार अनेक उद्योग करीत असते. पुन्हा हे विरोधकांच्या घोटाळ्यांवर सो कॉल्ड घोटाळ्यांवर बोलणार”.
“पुण्याच्या जैन विश्वस्त संस्थेचा जमीन घोटाळा साडेतीन हजार कोटींचा आहे. त्यात विरोधी पक्षांचे लोक सामील असतील तर फडणवीस यांनी तसे सांगावे. या जैन ट्रस्ट जमीन घोटाळ्याचे धागेदोरे मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचले आहेत. पुण्यातील जैन समाज या जमीन घोटाळ्याविरुद्ध फडणवीस यांना जाब विचारीत आहे व फडणवीस विरोधी पक्षांकडे बोट दाखवत आहेत. मुळात फडणवीस यांचे सरकार व कार्यपद्धती म्हणजेच एक महाघोटाळा आहे,” असा आरोप शिवसेनेने केला आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील घोटाळ्यांचे नवे पुरावे समोर आले आहेत. महिलांना आर्थिक सबळ करण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली, असे फडणवीस वगैरे नेहमीच सांगत असतात, परंतु प्रत्यक्षात फक्त 1500 रुपयांत महिलांची मते विकत घेण्याचा हा उद्योग आहे. या योजनेचा लाभ 12,431 पुरुषांनी घेतला. वर्षभर या पुरुषांनी मासिक 1500 रुपये घेतले, तर लाखभर अपात्र महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतला हेसुद्धा स्पष्ट झाले आहे. अपात्र लाभार्थींच्या खात्यांत 164.20 कोटी रुपये जमा करणाऱ्या सरकारला हा घोटाळा रोखता आला नाही असं शिवसेना म्हणाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



