
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एन डी ए येथे गुरुवारी बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. दरम्यान मस्तानी यांचे वंशज नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं म्हटलं आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला उशिरा आमंत्रण दिलं असून, व्यासपीठावर जागा देणार नसल्याचं आयोजकांनी सांगितले आहे, हा पेशव्यांच्या वंशजांचा अपमान असून, आपण कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पेशव्यांच्या पुण्यातील वंशजांना व्यासपीठावर जागा आहे मात्र आपल्याला खाली बसविण्यात येणार असल्याने आपण नाराज असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “सध्याचे बाजीराव पेशव्यांचे पुण्यातील वंशज रघुनाथ राव हे वाराणसी येथून भासकुटे परिवाराकडून दत्तक घेतले गेले आहेत.त्यामुळे मीच खरा बाजीराव पेशव्यांचा रक्त वंशज आहे. माझ्या पूर्वजांच्य बलिदानाचा गौरवशाली इतिहास आहे. माझे पूर्वज समशेर बहादूर यांनी (1761 ) पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठांच्या वतीने सहभाग घेतला. सत्ताविसव्या वर्षी त्यांचे निधन झाले.माझे पणजोबा नवाब अली बहादूर 1857 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना साथ देत, लढाई लढले”.
“या सर्व गौरवशाली इतिहासाकडे थोरले बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समितीचे कुंदन कुमार साठे आणि सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. दत्तक वंशजांना मानाचे स्थान देत, व्यासपीठावर स्थान दिले आहे. या कार्यक्रमांचे आमंत्रण देखील दोन दिवसांपूर्वी मला देण्यात आले असून, आपल्याला व्यासपीठावर बसवता येणार नाही, असं सांगितलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
“माझा याला विरोध नाही,पण या माध्यमातून ऐतिहासिक सत्य दडपण्याचा आणि अमित शहा यांना भरकटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाह हे इतिहासप्रेमी असून, त्यांनी यावर पुस्तक लिहिले आहे.त्यामुळे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. श्रीमंत बाजीराव पेशवा आणि मस्तानी साहिबा प्रेम आणि बलिदान यांचे प्रतीक आहे. आम्ही अशा प्रकारचा आमचा अपमान सहन नाही करू शकत. याद्वारे आमच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करावा, ही आमची मागणी आहे.आम्हीच बाजीराव पेशव्यांचे रक्त वंशज असून, यासाठी आम्ही डी एन ए चाचणी करायला तयार आहोत. तसेच अशा अपमानामुळे आम्ही कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत,” असं त्यांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.