
पुणे येथे होळीच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली आहे. कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवरील रॉयल फार्म्समध्ये लाईटिंगसाठी लावलेले लोखंडी गर्डर कोसळल्याने चार जण जखमी झाले. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. शहरात होळीनिमित्त रंगोत्सव आणि डीजे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिक रंग खेळण्यासाठी आणि संगीताचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंचाजवळ प्रकाशयोजनेसाठी जड लोखंडी गर्डर बसवण्यात आला होता. कार्यक्रम सुरू असतानाच हा गर्डर अचानक कोसळला आणि खाली उभ्या असलेल्या लोकांवर पडला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा अपघात इतक्या अचानक घडला की लोकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. काही जण गर्डरखाली अडकले, तर अनेकांच्या डोक्याला, हाताला आणि पायांना दुखापती झाल्या. उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले. रुग्णवाहिका बोलावून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात गर्डर योग्य प्रकारे बसवण्यात आला नव्हता किंवा मोठ्या आवाजामुळे व गर्दीमुळे कंप निर्माण होऊन तो कोसळला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी कार्यक्रम आयोजकांची चौकशी सुरू केली असून आवश्यक परवानग्या आणि सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली होती का, याची तपासणी केली जात आहे. याबाबत मुंढवा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी सांगितले की, रॉयल पाम्स मुंढवा येथे ‘कलर कल्चर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्टेजचा एक आडवा लोखंडी बीम कोसळला असून काही लोक जखमी झाले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, कोणीही गंभीर जखमी नसून परिस्थिती शांत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



