
Marathwada Floods : सीना नदीला आलेल्या पुरानं मराठवाड्यात होत्याचं नव्हतं केलं. गावंच्या गावं, शेतजमिनी, भरीस आलेली पिकं सारंकाही उध्वस्त झालं. अशा या मराठवाड्यात शेतकरी कोलमडला असला तरीही त्यानं हार मानलेली नाही. सध्या मराठवाड्यात पूरग्रस्तांना गरज आहे ती एका आधाराची आणि काहीशा सकारात्मकतेची.
महाराष्ट्रातील या मराठवाड्याचा इतिहास हा अतिशय समृद्ध, संघर्षमय आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि तो दुर्लक्षित राहता कामा नये. या भागाने अनेक साम्राज्यांदरम्यान बदल पाहिले. सातवाहन, चालुक्य, मुघल, निजामशाही आणि शेवटी भारताच्या स्वतंत्र्यानंतरचाच तो काळ.
मराठवाड्याचा इतिहास…
सातवाहन साम्राज्य (ई.स.पूर्व 1 शतक – ई.स. 2 शतक)
मराठवाडा हा सातवाहन साम्राज्याचा महत्त्वाचा भाग होता. जिथं त्यांची राजधानी “प्रतिष्ठान” (आजचं पैठण, जि. औरंगाबाद) इथं होती. ही मंडळी बौद्ध धर्माचे संरक्षक होती. अजिंठा लेणी याच काळात कोरल्या गेल्या असं म्हटलं जातं.
वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव राजवंश या सर्व राजवंशांनी या भागावर अधिराज्य गाजवलं. इथं अनेक देवळं, लेण्या आणि स्थापत्यकलेचे नमुने याच काळात तयार झाले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे एलोरा लेणी, घृष्णेश्वर मंदिर.
मध्ययुगीन काळातील मराठवाड्यात डोकावल्यास दिल्ली आणि मुघल सत्तेचा प्रभाव इथं दिसून येतो. 14व्या शतकानंतर मुस्लिम सत्तांमध्ये या भागाचा समावेश करण्यात आला. औरंगजेबानं येथील तत्कालीन खुल्ताबाद इथं जीवनातील शेवटचा काळ व्यतीत केला.
निजामशाही, आसफजाही राजवट (1724 – 1948)
मराठवाडा हैदराबादच्या निजामशाही सत्तेखाली मराठवाडा अनेक वर्ष राहिला. हा भाग हैदराबाद संस्थान म्हणून ओळखला जाऊ लागला. यामुळेच इथं उर्दू-फारसी भाषेचा व इस्लामिक स्थापत्यशैलीचा प्रभावही तुलनेनं अधिक दिसतो.
निजामाच्या काळात त्यानं भाषेप्रमाणं प्रांतांना नावं दिली होती. ज्यामुळं मराठी भाषिक बहुल प्रांताला मराठवाडा हे नाव देण्यात आलं आणि हेच नाव पुढेही प्रचलित झालं.
मराठवाड्यात मराठ्यांचा मराठ्यांचा उदय कसा झाला?
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पश्चात पेशव्यांनी मराठवाड्यावर प्रचंड प्रभाव पाडला. इथं अनेक किल्ले (उदा. दौलताबाद, पारांडा, नळदुर्ग) मराठ्यांनी ताब्यात घेतले. मराठ्यांनी निजामांशी अनेक लढाया केल्या. पानिपतनंतर पेशवे आणि निजाम यांच्यात सतत संघर्ष होत राहिलेले.
काळ बदलला, भारत स्वतंत्र झाला…
काळ बदलला, भारत स्वतंत्र झाला, पण हैदराबादचे निजाम भारतात विलीन होण्यास तयार नव्हते. 1948 मध्ये भारत सरकारने “ऑपरेशन पोलो” राबवल्यानंतर हैदराबाद संस्थान भारतात सामील झालं. या लढ्यात अनेकांना हौतात्म्य आलं. पुढे 1956 साली राज्य पुनर्रचना आयोगानुसार भाषावार प्रांतरचना झाली. ज्यामध्ये मराठी भाषिक भाग असलेला मराठवाडा महाराष्ट्रात आणि कन्नड/तेलगू भाषिक भाग कर्नाटक/आंध्र प्रदेशात गेला.
आज मराठवाडा विकासाच्या मार्गावर असून, त्यात 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचं औरंगाबाद), बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना. राज्याच्य राजकारणापासून ते अगदी समाजकारणापर्यंत हा मराठवाडा कायमच महत्त्वाच्या भूमिकेत राहिला आहे. सध्या मात्र निसर्गाचा मारा या प्रांताला सोसावा लागला असून आणखी एका संघर्षावर हा भाग आणि येथील नागरित मात करण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.