
जनतेच्या अडीअडचणीच्या काळात खासकरून महापुर आलेला असताना प्रशासनानं झोकून देऊन काम करणं अपेक्षित असतं. मात्र धाराशिवमध्ये महाप्रलयात सर्व गमावलेल्या ग्रामस्थांचा हंबरडा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात ऐकू येत असताना तिथल्या
जिल्हाधिका-यांना त्याचं काहीही देणंघेणं पडलेलं नाही.. उलट ते एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचगाण्यात दंग आहेत.. या अशा प्रशासकीय अधिका-यांमुळे प्रशासनाला तर बोल लागतातच पण ग्रामस्थांचेही हाल होतात.
एकीकडे काळीज पिळवटणारा आक्रोश… दुसरीकडे त्याच धाराशीवच्या जिल्हाधिका-यांची डान्समस्ती पाहा.. मंडळी ही दोन्ही दृश्य एकाच जिल्ह्यातली आहेत… धाराशिवमध्ये यंदा अतिवृष्टी झाली.. शेतक-यांच्या शेतात, ग्रामस्थांच्या घरात आणि बायाबापड्यांच्या डोळ्यात सर्वत्र पाणीच पाणी… तिथलं नुकसान पाहून अवघा महाराष्ट्र दु:खी झाला.. शेतच्या शेतं, घरच्या घरं वाहून गेल्यानं शेतक-यांच्या घरातल्यांनी फोडलेला टाहो सर्वांनी पाहिला.. पाषाणहृदयी लोकांना कुठे त्याचं सोयरंसुतक असतं? जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा 24 सप्टेंबरचा तुळजापुरातल्या एका कार्यक्रमातला डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला.. तो पाहताच अनेकांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी या दोघांचाही यथोचित समाचार घेतला. ज्या जिल्ह्याच्या कारभाराची जबाबदारी आपल्यावर आहे, ते शेतकरी देशोधडीला लागलेत. ग्रामस्थांचे संसार वाहून गेलेत. वयोवृद्धांचे, आयाबहिणींचे,चिमुकल्यांचे अश्रू आजही थांबलेले नाहीत. आजची भ्रांत त्यांना पडली असताना जिल्हाधिका-यांनी नाचण्यात दंग आहेत.. अशा पाषाणहृदयी जिल्हाधिका-यांकडून कसली अपेक्षा ठेवायची?.. मदत सोडा, धीर देणारे शब्द पण सोडा किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका.. असा संताप व्यक्त होतोय.
व्हिडिओसमोर येताच राजकीय नेत्यांनीही तिखट शब्दात प्रतिक्रिया दिल्या. शिवसेना UBT चे खासदार यांनी सरकार यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न विचारलाय.
या परिस्थितीत झोकून देऊन काम करणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी दिलीय. अशा जिल्हाधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
जिल्हाधिका-यांनी असंवेदनशील वागणं दुर्दैवी आहे. त्यांनी आपला संपूर्ण वेळ जनतेच्या कामी लावावा, असं आवाहन शिवसेना UBT चे आमदार ओमराजे निंबाळकर यांनी केलंय. यावर सरकारकडूनही प्रतिक्रिया समोर आल्यात. मला याबाबत काही माहिती नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. त्या जिल्हाधिका-यांनी कृत्य केलं असेल तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याची दखल घेतील, असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी पुराच्या पाण्यात उतरून ग्रामस्थांची सुटका केलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे आमदार ओमराजे निंबाळकरांचं सर्वांनी कौतुक केलं होतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जनतेसाठी धावून जाणं दूर उलट तिथले जिल्हाधिकारी नाचत गात आहेत.. दुस-याचं दु:ख पाहून मनाला पाझर फुटत नसेल, आपल्या कार्याप्रती निष्ठा नसेल तर हे असं वागणं घडतं..
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.