
जागतिक मगर दिनानिमित्त सातपुडा फाउंडेशन आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाने विशेष शैक्षणिक उपक्रम राबवला. सालई आणि कोलितमारा या बफर गावांतील प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
.
सालई गावातील विद्यार्थ्यांनी सिल्लारी येथील अमलतास मोगली पर्यावरण शिक्षण केंद्रात टायगर टेल आणि घोटुल माहिती केंद्राला भेट दिली. तेथे त्यांना व्याघ्र, आदिवासी संस्कृती आणि जैवविविधतेची माहिती मिळाली. मोगली कॉन्फरन्स हॉलमध्ये मगरांवरील माहितीपट दाखवून संवाद सत्र घेण्यात आले.
कोलितमारा गावातील विद्यार्थ्यांनी पेंच नदीकाठची सफर केली. नागपूर परिसराची जीवनरेखा असलेल्या पेंच नदीत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात ५३ मगर आणि अनेक अंडी घालण्याच्या जागा आढळल्या. विद्यार्थ्यांनी नदीकिनारे, दलदली पक्षी आणि मगरांच्या वावराचे पुरावे पाहिले.
सालई गावातील विद्यार्थ्यांनी दुपारी सिल्लारी गेटहून कॅन्टर सफारी केली. जुना बोट कॅम्प आणि मियावाकी लागवड क्षेत्राला भेट दिली. त्यांना जंगलातील खुणा, सूर्यस्नान करणाऱ्या मगरी आणि त्यांचे अधिवास समजावून सांगण्यात आले.
या उपक्रमाची संकल्पना सातपुडा फाउंडेशनचे उपसंचालक मंदार पिंगळे यांची होती. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मणकर यांचे पाठबळ लाभले. फाउंडेशनचे अधिराज सिंग, बंदू उईके, दिव्यम वाळके, निखिल कोहळे आणि राधिका भालवी यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.