
तक्रारदाराविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून, बंडगार्डन पोलिस ठाण्यात नेमणूकीस असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकावर बंडगार्डन पोलिस ठाण्यातच लाचलुतप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. संदीप खेडकर असे लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार खेडकर याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणूकीच्या संदर्भात तक्रार अर्ज दाखल होता. त्या तक्रार अर्जाची चौकशी पोलिस उपनिरीक्षक खेडकर याच्याकडे देण्यात आली होती. त्या अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदाराच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी खेडकर याने तक्रारदाराकडे सुरुवातीला दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने 3 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या तक्रारीची लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी करण्यात आली होती. त्यामध्ये खेडकर याने तक्रारदाराच्या विरुद्ध फसवणूकीच्या संदर्भाने आलेल्या तक्रार अर्जामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी पंचासमक्ष तसेच तक्रारदाराच्या वकीलासमक्ष स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार खेडकर याच्या विरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त निता मिसाळ, पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांच्या पथकाने केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



