
Pravin Gaikwad Allegations on BJP: माझ्यावर हल्ला करणाऱ्यावर 10 गुन्हे आहेत. बावनकुळे यांनी कारवाई करु असं सांगितलं आहे. पण त्यांनीच पोलीस स्टेशनला फोन करुन त्याला (दीपक काटे) हवी ती मदत दिली पाहिजे असं सांगितलं असा आरोप संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहे. “माझा पोलिसांवर, बावनकुळे किंवा भाजपाच्या प्रवक्त्यांवरही विश्वास नाही. त्यांचा अक्कलकोट पोलीस ठाण्यात फोन आला होता की कमीत कमी कारवाई करा, दोन दिवसात बाहेर पडला पाहिजे असं सांगितलं आहे. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनानांनी महाराष्ट्रभर सन्मान करायचा. ही काय महाराष्ट्राची संस्कृती आहे? हा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे?,” अशी विचारणा प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक आणि धक्काबुक्की प्रकरणी पोलिसांनी शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
‘हत्याच झालीच पाहिजे अशी भाजपाची मानसिकता’
“छत्रपती संभाजी महाराज हेच आमचे आदर्श, प्रेरणा पुरुष आहेत. आम्ही त्यांची जयंती, पुण्यतिथी करतो. मालिका, चित्रपट काढतो. आम्ही कुठे अपमान करत आहोत? पण संभाजी ब्रिगेडला भिडण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवं होतं. आम्ही मानवतेची मूल्य सांगत आहोत. घटनेला धरुन काम कर आहोत. संभाजी ब्रिगेडला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पाडली पण सामाजिक संघटनांना कसं थाबंवायचं ही त्यांची समस्या आहे. त्यांना ईडी लावता येत नाही, आयकर, एसआयटी नाही. मग अशा फाटक्या कार्यकर्त्यांना संपवायला हवं, त्यांची हत्याच झालीच पाहिजे अशी भाजपाची मानसिकता दिसत आहे. मी इतिहासाला धरुन बोलत आहे, मी हवेत बोलत नाही,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
‘….त्या दिवशी संभाजी ब्रिगेडचा राजीनामा देईन’
“ही वस्तुस्थिती आणि अनुभव आहे. माझ्या हत्येचा प्रयत्न झाला होता. याची सर्व नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची आहे. ते भाजपाचे प्रमुख नेते आहेत. हा कार्यकर्ता त्यांचा आहे. त्याच्यावर काही कारवाई होणार नाही. अजूनही त्याच्यावर लावली गेली पाहिजेत ती कलमं लावलेली नाही. मला अजूनही त्याच्यापासून धोका राहणार आहे, पण मी पोलीस संरक्षण घेणार नाही. माझा बहुजन समाज, संभाजी ब्रिगेडवर विश्वास आहे. माझं काही होणार असेल त्या दिवशी संभाजी ब्रिगेडचा राजीनामा देईन,” असं त्यांनी जाहीर केलं आहे.
‘RSS ची मीटिंग झाली…’
“आमचा सामाजिक समतेचा, बंधुतेचा आणि मानवता प्रस्थापित करण्याचा विचार आहे. 2014 पासून मनुस्मृतीच्या, वर्णवर्चस्वाच्या विचारसरणीचा म्हणजेच पुरोगामी आणि प्रतिगामी विचाराचा संघर्ष सुरु झाला आहे. अशा प्रकारच्या संघटना संपवल्या पाहिजेत अशी मीटिंग संघ परिवारात मागच्या महिन्यात झाली होती. त्यानंतर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी अशा पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. ही सगळी चर्चा काही माझ्या मित्रांकडून कळाली होती,” असा दावा त्यांनी केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.