
Prabhadevi Bridge Closed : वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत परळ व प्रभादेवी परिसरातील पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना प्रभादेवी पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याजागी नवीन पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उभारला जाणार असून, त्यासाठी शुक्रवार रात्रीपासून तात्पुरता वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली असून, त्याचा परिणाम एसटी बससेवेवर होणार आहे.
एसटी महामंडळाच्या परळ आगारातून दादरकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या साध्या, सेमी-लक्स आणि शिवशाही या बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मडके बुवा चौकातून (परळ टी.टी. जंक्शन) सुरुवात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने, कृष्ण नगर जंक्शन, परळ वर्कशॉप, सुपारी बाग जंक्शन, भारत माता जंक्शन, संत जगनाडे चौक येथे उजवीकडे वळून साने गुरूजी मार्गाने चिंचपोकळी पुलावरून कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (चिंचपोकळी जंक्शन) मार्गे एन.एम. जोशी मार्गाने परळ आगारात पोहोचतील. त्याच मार्गाने परतफेरी केली जाईल.
प्रवाशांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार
या पर्यायी मार्गामुळे साधारण 6 किलोमीटर अतिरिक्त अंतर बसला पार करावे लागणार आहे. परिणामी, इंधन खर्च आणि वेळेचा विचार करून एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबई-पुणे शिवनेरी तसेच दादरवरून ये-जा करणाऱ्या साध्या, सेमी आणि शिवशाही बसच्या तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता असून, प्रवाशांना काही अतिरिक्त पैसे मोजून तिकीट खरेदी करावे लागेल. प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा विचार करून वेळेचे नियोजन करावे असे एसटी प्रशासनाने सुचवले आहे.
पर्यायी वाहतुकीसाठी सूचना
वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले असून, यामुळे वाहतूक सुरळीत राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही, ट्रॅफिक दरम्यान काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रभादेवी पुलाचे नूतनीकरण हा वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाचा भाग असून, या प्रकल्पामुळे पुढे वाहतुकीस सोय आणि शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल आणि प्रवाशांचा वेळ व खर्च कमी होईल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले.
FAQ
1. प्रभादेवी पूल का बंद करण्यात आला आहे?
वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत परळ आणि प्रभादेवी परिसरातील पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना प्रभादेवी पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याजागी एमएमआरडीएकडून नवीन पूल उभारला जाणार असून, त्या कामासाठी शुक्रवार रात्रीपासून तात्पुरता पूल बंद करण्यात आला आहे.
2. प्रभादेवी पूल किती जुना आहे आणि तो का पाडला जाणार आहे?
प्रभादेवी पूल हा 125 वर्षे जुना आहे. तो जुना झाल्याने आणि वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पासाठी नवीन द्विस्तरीय (डबल डेकर) पूल बांधण्यासाठी पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प अटल सेतू, वरळी-वांद्रे सी लिंक आणि कोस्टल रोडला जोडण्याचा भाग आहे.
3. प्रवाशांना अतिरिक्त खर्च कसा होणार आहे?
पर्यायी मार्गामुळे इंधन खर्च आणि वेळ वाढल्याने मुंबई-पुणे शिवनेरी तसेच दादरवरून ये-जा करणाऱ्या साध्या, सेमी-लक्झरी आणि शिवशाही बसच्या तिकीट दरात वाढ होईल. प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजून तिकीट खरेदी करावे लागेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.