
ED Raid Cabinet Minister Connection: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भातील वादावर पडदा टाकण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असतानाच अन्य एक मंत्री नव्या वादात सापडल्याचं चित्र दिसत आहे. योगेश कदम हे बार डान्स प्रकरणामुळे, संजय गायकवाड हे अधिवेशनादरम्यानच्या मारहाणी प्रकरणामुळे तर संजय शिरसाटही अडचणीत आल्याचं मागील काही काळात दिसून आलं आहे. या वादांवर पडता पडत असतानाच नवा मंत्री अडचणीत आला आहे.
सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्तेवर ईडीची चौकशी सुरु करण्यात आली आहे. वसई-विरार महापालिकेचे आयुक्त रहिलेल्या अनिलकुमार पवार यांच्या मालमत्तेवर राज्यभर ईडी कारवाई सुरू असून, त्यांच्या नाशिकसह सटाणा येथील मालमत्तेवर ईडीच्या एका पथकाने मंगळवारी सकाळपासून कारवाई सुरू केले असून त्यांच्या भावाच्या नावावर येथील मालमत्ता आहे. असं असतानाच आता अनिलकुमार पवार यांचं देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याशी कनेक्शन असल्याचं समोर येत आहे.
22 तास चौकशी झालेला हा अधिकारी कोण?
सटाणा तालुक्यात विविध ठिकाणी तसेच नाशिकमध्ये अनिलकुमार पवार व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे शेत जमीन, फॉर्म हाऊस तसेच प्लॉट असल्याचे समजते सकाळच्या सुमारास सटाणा शहरात इनोव्हा गाड्या व त्यात पोलीस असल्याने शहरात चर्चेचा विषय बनला होता. पवार यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार सोडल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांच्या शासकीय निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित नाशिक पुणे अशा एकूण बारा ठिकाणी ईडीने छापेमारी केली. तब्बल 22 तास त्यांची चौकशी सुरू होती. त्यांच्या पत्नी आणि मुलीला बोलावून चौकशी करण्यात आली. मात्र वसई पश्चिमेच्या ज्या शासकीय निवासस्थानी माजी आयुक्त अनिल कुमार पवार होते त्या ठिकाणी पवार यांनी सुरुवातीला ईडीच्या अधिकाऱ्यांना एक तास दरवाजा न उघडून रोखून धरलं होतं. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला.
ईडीच्या अधिकाऱ्यांना काय ताब्यात घेतलं?
मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली ईडीची कारवाई बुधवारी पहाटे दीड वाजल्यानंतर ईडी अधिकारी या ठिकाणावरून निघून गेले. यावेळी अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे आपल्या सोबत नेल्याचे दिसून आले. परंतु अनिल कुमार पवार यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले नाही.
कोणत्या मंत्र्याशी कनेक्शन?
अनिलकुमार पवार यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे पडत असतानाच आता अनिलकुमार पवार यांचं मंत्री दादा भुसेंशी कनेक्शन असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अनिलकुमार पवार हे दादा भुसेंचे भाचे जावई असल्याची माहिती समोर येत आहे. अनिलकुमार पवार यांच्या संपत्त्यांवरील ईडीच्या कारवाईसंदर्भात बोलताना राऊत यांनी, “अनिल पवार यांना नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नियुक्तीसाठी दादा भुसे यांनी अनिल पवारसाठी आग्रह केला होता. या कारवाईचे धागेदोरे मंत्र्यापर्यंत जातात. दादा भुसे यांचे शिफारसपत्र सुद्धा आहे,” असा दावा केला आहे.
शिंदेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न?
“मंत्र्यांवर समज देऊन सोडून द्या असा फडणवीस ॲक्ट आता आला आहे. चुकीचं काम करणाऱ्या मंत्र्यांना सोडून दिलं जातंय. समज द्यायची आणि माफ करायचे असे फडणवीस करत आहेत,” असं राऊत म्हणालेत. पुढे बोलाताना, “शिंदे यांच्याभोवती दबावाचे राजकारण केले जात आहे. अमित साळुंखे, अनिल पवार यांवरील धाड हे सगळं पाहता मिंधे गटाच्या लोकांना इशारा दिला जातोय. टेबलावरच्या फाईली कुठे जातात ते पाहा,” असंही राऊत म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.