
राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्री सन्मान सोहळ्यातील एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून संजय राऊतांनी जोरदार चिमटा काढला आहे. शिंदे सन्मान सोहळ्याला गेले नाही याचा अर्थ ते स्वत:ला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नसल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. यावेळी राऊतांनी फडणवीसांना शिंदेंपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याला एकनाथ शिंदेंनी मारलेल्या दांडीवरुन सुरु झालेलं कवित्व संपण्याचं नाव घेत नाही. एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरुन अजितदादांनी नाराजी व्यक्त केली असताना संजय राऊतांनी या वादात आणखी तेल घालणारं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नसल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. एकनाथ शिंदे स्वतःला भावी मुख्यमंत्री समजत असल्यानं फडणवीसांनी त्यांच्यापासून सावध राहावं असा इशाराही त्यांनी दिला आहे.
संजय राऊतांच्या या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. महायुतीचा सुखाचा संसार संजय राऊतांना पाहावत नसल्याचा टोला परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी लगावला आहे. महायुतीचा फेविकॉलचा जोड आहे तुटणार नाही असंही सांगायला सरनाईक विसरले नाहीत.
महायुतीत कोणतीही स्पर्धा नसल्याचं नेते सांगत असले तरी खुद्द एकनाथ शिंदेंनी आपण दरे गावात असलो की मुंबईतलं वातावरण तापतं असं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे मुंबईच्या तापमानाबाबत जे बोलले ते खरं असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. मुंबईचं तापमान वाढत असलं तरी शिंदेंनी वारंवार दरे गावात यावं असंही फडणवीस म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे हे शिंदेंनाच माहिती. पण संजय राऊत महायुतीत मिठाचा खडा कसा पडेल, महायुतीत विसंवाद कसा होईल याची दक्षता मात्र बाळगून असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं आहे. संजय राऊत काय बोलतात याची आपण दखल घेत नाही असं फडणवीस नेहमीच म्हणतात. यावेळीही राऊतांच्या इशा-याची दखल घेतली जाणार नाही याची मात्र खात्री बाळगता येणार नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.