
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाहेरचा रस्ता दाखवला. या निर्णयामुळे राजकीय वर्त
.
शिंदे -फडणवीसांत का वाढत आहे संघर्ष?
2005 मध्ये मुंबईतील विनाशकारी पुरानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. ही राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वात महत्त्वाची संस्था आहे. मुख्यमंत्री या प्राधिकरणाचे अध्यक्ष असून त्यात राज्यातील इतर प्रमुख विभागातील मंत्र्यांचा समावेश आहे. यंदा त्यात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना स्थान देण्यात आले आहे. पण शिंदे यांना त्यापासून दूर ठेवण्यात आले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे नगरविकास खाते शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय धक्कादायक असल्याचे मानले जात आहे. त्याच्या विभागाचे अधिकारी बचाव आणि मदत कार्यावर नजर ठेवतात. पण त्यानंतरही शिंदेंनाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापनापासून दूर ठेवले आहे. या निर्णयामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता बळावली आहे.
‘इंडिया टुडे’च्या एका वृत्तानुसार, केवळ शिंदे गटाच्या मंत्र्यांनाच हा धक्का नाही. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी अलीकडेच आपल्या कार्यालयात पीए आणि ओएसडींच्या नियुक्तीला जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या मते, अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या मुख्यमंत्री कार्यालयाने रोखून धरल्या आहेत. त्यामुळे मंत्र्यांना प्रशासकीय निर्णय घेताना हतबल वाटू लागले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकांपासूनही अंतर
यासंबंधीच्या वृत्तांनुसार, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील या शिंदे गटातील बड्या चेहऱ्यांना या विलंबाचा फटका बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 2014 पासून विविध विभागांत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही प्रलंबित लोंबकळत ठेवण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांवर भाजप नेतृत्वाला पूर्ण नियंत्रण हवे आहे. या माध्यमातून खरी सत्ता कुठे आहे? असा अप्रत्यक्ष पण थेट संदेश शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला जात असल्याचा दावा केला जात आहे.
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा केली आहे. या कक्षामार्फत राज्यभरातील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कक्षाचे कामकाज मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या धर्तीवर चालेल असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कामासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष यापूर्वीच सुरू आहे. पण त्यानंतरही शिंदे यांनी या कक्षाची स्थापना करून आपला समांतर कारभार हाकण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा दावा केला जात आहे. यावरूनही एकनाथ शिंदे सरकारचमध्ये नाराज असल्याचे संकेत मिळत आहेत.
महायुतीत फूट पडण्याची भीती
महायुती सरकारमध्ये वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. त्यात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यावरून महायुतीत स्पष्टपणे मतभेद झाल्याचे दिसून आले. शिवसेनेला या दोन्ही जिल्ह्यांचे पालकत्व हवे होते. पण हे जिल्हे अनुक्रमे राष्ट्रवादी व भाजपला सोपवण्यात आले. पण शिवसेनेच्या आक्षेपानंतर या दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. पण प्रजासत्ताक दिनी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी रायगड येथे झेंडावंदन केले. यामुळे परिस्थिती अधिकच वाईट झाली. महायुतीतील नेतृत्वाबाबतची भांडणे शिगेला पोहोचल्याचे या घटनेतून स्पष्ट संकेत मिळाले.
शिंदे गटात तीव्र नाराजी
सत्ताधारी भाजपच्या या विरोधाभासी भूमिकेमुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी पसरली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांच्याच विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून मंत्र्यांना निर्णयांची संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश दिलेत. शिंदे गटाच्या मते, नोकरशाही सरकारवर वरचढ ठरता कामा नये. हा मुद्दा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्याचे संकेतही शिंदे गटाने दिलेत.
एकनाथ शिंदे म्हणतात -मी नाराज नाही
दुसरीकडे, एकनाथ शिंदे नुकतेच नांदेडमध्ये बोलताना आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते. ते म्हणाले होते, मी मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी मला साथ दिली, आता ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मी त्यांना साथ देत आहे. मी कुठेही नाराज नाही, लोकं काहीही चर्चा करतात, त्याकडे मी लक्ष देत नाही. काही कॅबिनेट मीटिंगमध्ये आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय मिळून घेतले. त्यामुळे मी नाराज असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.